आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ!
मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल,
40 कोटींच्या फसवणुकीचा आरोप
कोल्हापूर:-संताजी घोरपडे साखर कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक शेतकर्यांकडून प्रत्येकी 10 हजार प्रमाणे शेअर्स भांडवल घेतले. यामध्ये 40 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार विवेक विनायक कुलकर्णी व अन्य 16 जणांनी मुरगूड पोलिस ठाण्यात दिली आहे.त्यानुसार आ. हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, आ. मुश्रीफ समर्थकांनी मुरगूड पोलिस ठाण्याला गराडा घालून यास तीव्र आक्षेप घेतला आहे.सुडबुद्धीतून गुन्हा दाखल केल्याचा आरोप मुश्रीफ यांच्या समर्थकांनी केला आहे. तर या षडयंत्रामुळे कोल्हापुरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहिल असा इशाराही मुश्रीफ यांच्या समर्थकांनी दिला आहे.
कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2012 च्या दरम्यान, व्यक्तिगत संपर्कातून साखर कारखाना उभारणीसाठी आ. मुश्रीफ यांनी खुले आवाहन करून लोकांकडून दहा हजार रुपयांप्रमाणे शेअर्स भांडवल घेतले. पण या संबंधातील कोणतीही पावती व शेअर्स सर्टिफिकेट दिले नाही.तर चौकशीसाठी घोरपडे साखर कारखाना हा केवळ मुश्रीफ कुटुंबीय व अन्य नातेवाईक अशा एकूण 17 जणांचा कारखाना असल्याचे दिसून येते. असे असताना, मुश्रीफ यांनी राजकीय पदांचा गैरफायदा घेत गोरगरीब व शेतकर्यांची 40 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या फिर्यादीनुसार व जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशाने आपण गुन्हा दाखल केल्याचे मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी सांगितले.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले. तेव्हा कागलमधील काही शेतकऱ्यांनी हसन मुश्रीफ यांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार किरीट सोमय्यांकडे केली होती. त्यानंतर मुश्रीफांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा पहिला आरोप केला होता. त्यानंतर कागल येथील सर सेनापती साखर कारखान्यामध्येही घोटाळा केल्याचा आरोप करत सोमय्यांनी ईडीकडे काही कागदपत्र दिली. त्यानंतर अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित घोटाळ्याचा तिसरा आरोपही सोमय्यांनी केला होता. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. त्यानंतर मुश्रीफ यांच्या घरासह, ऑफिस, नातेवाईक आणि मुलीच्या घरीही ईडीने छापेमारी केली होती.राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि ऑफिसवर काही दिवसांपूर्वी ईडीने धाड टाकली होती. पहाटेपासून ईडीने धाड टाकण्यास सुरवात केली होती. कागल येथील घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती.