अवघ्या चार तासात ७ वर्षीय बालकाचा शोध
Raju Tapal
January 17, 2022
33
रेल्वेप्रवासात मध्यरात्री निर्जन रेल्वेस्थानकावर उतरलेल्या ७ वर्षीय बालकाचा अवघ्या चार तासात व्हॉट्स अँप द्वारे शोध घेण्याची कामगिरी दौंड लोहमार्ग पोलीसांनी केली.
लक्ष्मीचंद दशरथ पवार हे एका खाजगी वित्तीय संस्थेत नोकरीस असून लक्ष्मीचंद व मोहिनी पवार रा. डोंबिवली जि.ठाणे सास-याच्या घराच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी सहकुटूंब कल्याण येथून लातूरला निघाले होते.
हे दाम्पत्य मुले आणि नातेवाईकांसह मुंबई - लातूर एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. १४ जानेवारी रोजी मध्यरात्री मलठण ता.दौंड रेल्वेस्थानकावर क्रॉसिंगकरिता एक्सप्रेस थांबली असता ७ वर्षीय ओम लक्ष्मीचंद पवार हा गाडीतील आरक्षित डब्यातुन स्टेशनवर उतरला. सिग्नल मिळाल्याने एक्स्प्रेस सोलापूरच्या दिशेने रवाना झाली. मात्र ओम फलाटावरच राहिला.
ओमच्या पालकांना तो जागेवर नसल्याचे लक्षात आले. परंतू तोपर्यंत एक्स्प्रेस कुर्डूवाडीला पोहोचली होती.
पवार कुटूंबियांनी ही बाब लोहमार्ग पोलीसांना सांगितल्यानंतर लोहमार्ग पोलीसांनी तातडीने व्हॉट्स अँपद्वारे मुलाचे छायाचित्र व वर्णन दौंड - सोलापूर, दौंड - पुणे, दौंड - नगर लोहमार्गावरील रेल्वेस्थानक व धावत्या रेल्वेगाड्यांमधील लोहमार्ग पोलीस रेल्वे सुरक्षा दल ,रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांना कळविली.
ओम पवार हा मलठण स्थानकाच्या एका बाजूला बसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाल्याने त्यांनी व्हॉट्स अँप वरील छायाचित्र व वर्णन जुळल्याने त्याला ताब्यात घेत पोलीसांना कळविले. पोलीसांनी ओम यास पालकांच्या ताब्यात दिले.
दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे फौजदार ताराचंद सुडगे, हवालदार एकनाथ लावंड, अजित सावंत, संतोष पवार, सर्फराज खान, रमेश पवार, पोलीस नाईक सुरेखा बनसोडे, दौंड रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक तेजप्रकाश पाल, फौजदार सुनील यादव ,प्रदीप गोयेकर यांनी शोधमोहिमेत सहभाग घेतला.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर
Share This