टिटवाळा परिसरातील ६६ वीजचोरावर कारवाई
तब्बल ३० लाख ७३ हजार रुपयांची वीज चोरी उघड
राजू टपाल.
टिटवाळा :- कल्याण ग्रामीण विभागातील टिटवाळा,इंदिरा नगर,गणेशवाडी आणि बल्याणी परिसरात वीजचोरी उघडकीस आणण्यास महावितरण ला यश आलेले असून महावितरणच्या पथकाने ६६ वीजचोरांवर कारवाई करत तब्बल १ लाख २१ हजार युनिट वीज बेकायदेशीररीत्या वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे.
टिटवाळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांनी जुलै–ऑगस्ट महिन्यात विशेष मोहीम राबवुन ग्राहकांचे मीटर तपासले असता काहींनी मीटर असूनही थेट जोडणी घेऊन वीज चोरी केली, तर काहींनी सर्व्हिस वायरमध्ये छेडछाड केली होती. या बेकायदेशीर कृत्यामुळे केवळ महावितरणच नव्हे तर प्रामाणिक ग्राहकांचंही नुकसान होत होतं.
महावितरणने या सर्व वीज चोरांविरोधात वीज कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. कायद्यानुसार वीज चोरी हा गंभीर गुन्हा आहे –दोष सिद्ध झाल्यास कठोर कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. ही मोहीम महावितरण कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा,अधीक्षक अभियंता व्ही.एस.फुंदे, कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहाय्यक अभियंता निलेश शिर्के, शाखा अभियंता तुकाराम घोडविंदे, धनंजय पाटील, सचिन पवार आणि योगेश चेंदवणकर या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन तपासणी पूर्ण केली.