• Total Visitor ( 588353 )
News photo

स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत

Raju Tapal publisher June 15, 2026 221

स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत



शिरूर:- तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत सोमवार दि. १५ जून २०२६ रोजी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा प्रारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात झाला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रशालेत विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्वागतोत्सवात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच रेड कार्पेट अंथरून विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळ,तळेगाव ढमढेरेचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे आणि उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रशालेतील शिक्षकांनी नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे मनापासून स्वागत केले. विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण व्हावे आणि पहिल्याच दिवशी आनंददायी वातावरण अनुभवता यावे यासाठी मिकी माऊस आणि मिनी माऊस यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्टून पात्रांसोबत विद्यार्थ्यांनी आनंदाने संवाद साधत भरपूर उत्साह व्यक्त केला. याचवेळी प्रशालेचे ग्रंथपाल शंकर उकले यांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शालेय पुस्तकांचे वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी आणि विविध उपक्रमांबाबत प्रेरणा मिळावी यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच चित्रकला विभाग यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या चित्रांचे उगवते कलाकार या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोकराव दहिफळे,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक मोहन ओमासे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोकराव दहिफळे यांनी केले. सूत्रसंचालन हर्षदा परदेशी यांनी केले, पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी आभार मानले. या उपक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ,तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते तसेच ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे यांनी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आनंददायी,प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरण मिळाल्याने विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अशा उत्साहपूर्ण पद्धतीने झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाल्याचे दिसून आले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement