कल्याणमध्ये दिव्यांग बांधवांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर...
विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पुढाकाराला प्रतिसाद,२८ दिव्यांग बांधवांची तपासणी...
संदीप शेंडगे.
कल्याण :- दिव्यांग बांधवांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात असलेल्या विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मंगळवार,२७ ऑक्टोबर रोजी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या एकूण २८ दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला.या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना विविध वैद्यकीय तपासण्या, उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले.दिव्यांग लोक संघटना (APD), पुणे यांच्या Spinal Cord Injury Rehabilitation Program अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाठीच्या कण्याशी संबंधित समस्या, कंबरदुखी तसेच वाकून चालण्याचा त्रास असलेल्या दिव्यांग बांधवांसाठी या शिबिरात विशेष वैद्यकीय तपासणी आणि मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.शिबिरात रक्त व लघवीच्या तपासण्या,पोट व पेल्विसची अल्ट्रासोनोग्राफी (सोनोग्राफी),फिजिओथेरपीविषयक सल्ला तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक मार्गदर्शन अशा विविध सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या. आर्थिक अडचणी किंवा अन्य कारणांमुळे वैद्यकीय तपासणीपासून वंचित राहणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी हे शिबिर विशेष उपयुक्त ठरले.या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक शेळके,डॉ. द्वारका शेळके आणि रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.दिव्यांग बांधवांच्या आरोग्यविषयक समस्या समजून घेऊन त्यांना आवश्यक वैद्यकीय तपासणी, उपचार आणि योग्य मार्गदर्शन मिळावे,हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश असल्याचे डॉ. द्वारका शेळके यांनी सांगितले.
तर, दिव्यांग बांधवांसाठी अशा प्रकारचे शिबिर आयोजित करून त्यांना सहकार्य करता आले, याचे विशेष समाधान असल्याचे विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक शेळके यांनी नमूद केले. दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी रुग्णालय नेहमीच सहकार्य करण्यास तयार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.या शिबिराच्या आयोजनासाठी दिव्यांग संस्थेचे दत्ता काळुंखे आणि डॉ.आदर्श यांनीही विशेष सहकार्य केले. रुग्णालयातील डॉक्टर,परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.