टिटवाळा परिसरात भीषण अपघात,दोघांचा मृत्यू,एक गंभीर जखमी...
भरधाव दुचाकी ट्रकवर आदळली,गणपती मंदिराजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दुर्घटना...
राजू टपाल:
टिटवाळा :- टिटवाळा परिसरात भरधाव दुचाकी आणि उभ्या ट्रकचा भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे अपघातासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,१९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास रेजन्सी सर्वम,टॉवर क्रमांक ३९ येथून गणपती मंदिराच्या दिशेने दुचाकी जात होती. दुचाकीवर सुमित शर्मा,देव पारखे आणि अंजू राय हे तिघे प्रवास करत होते.यावेळी भरधाव वेगात असलेली दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली.या भीषण धडकेत तिघेही गंभीर जखमी झाले.अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी गोवेली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र,तेथील डॉक्टरांनी पहाटे ३.१५ वाजता देव पारखे यांना मृत घोषित केले. त्यानंतर सकाळी ३.३० वाजता सुमित शर्मा यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.दरम्यान,अंजू राय यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे मुंबईतील केईएम रुग्णालयात हलविण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.भरधाव वेगाने वाहन चालविणे किती धोकादायक ठरू शकते, हे या दुर्दैवी घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.