संत तुकाराम साखर कारखान्याकडून संदीप गोडसे यांचा गौरव
फुलगाव प्रतिनिधी: गौतम पाटोळे:
मरकळ (ता. खेड) :-येथील प्रगतशील शेतकरी संदीप संभाजी गोडसे यांनी सन २०२५-२६ या वर्षात संपूर्ण संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात पूर्वहंगामी उसाचे प्रति हेक्टरी २१५.३६० मेट्रिक टन विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुणे जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी द्रौपदा लॉन्स, वाकड येथे झाली. यावेळी पूर्वहंगामी उसाचे सर्वाधिक उत्पादन घेतल्याबद्दल कारखान्याच्या वतीने संदीप गोडसे यांचा शाल, श्रीफळ, भक्ती-शक्ती मूर्ती व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
संदीप गोडसे यांच्या वतीने त्यांचे चुलते व श्रीराम पतसंस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन शिवाजी गोडसे यांनी हा सत्कार स्वीकारला. संदीप गोडसे हे मरकळ परिसरातील उद्योजक रमेश गोडसे यांचे पुतणे आहेत.
या वेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले,अध्यक्ष,उपाध्यक्ष अनिल लोखंडे,आमदार शंकरराव मांडेकर,संचालक मंडळ तसेच ह.भ.प.संभाजी अर्जुन लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विक्रमी ऊस उत्पादनासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि मेहनतीची सांगड घालणाऱ्या संदीप गोडसे यांच्या कामगिरीने परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.