निळवंडे शाळेत ‘हे गीत वामनाचे’ शाहिरी जलसा उत्साहात
‘आनंददायी शनिवार’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना वामनदादांच्या विचारांचा जागर
राजू टपाल.
संगमनेर:- अहिल्यानगर जिल्हा परिषद आयोजित ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत जि. प. प्राथमिक शाळा,निळवंडे (ता. संगमनेर) येथे ‘हे गीत वामनाचे’ या अनोख्या शाहिरी जलशाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. शाहीर वामनदादा कर्डक यांच्या गीतांमधून,कविता आणि पोवाड्यांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्याचा तसेच सामाजिक विचारांचा परिचय करून देण्यात आला. दिंडोरी (जि. नाशिक) येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आणि शाहीर वामनदादा कर्डक यांच्या वंशावळीतील नातू सुभाष कर्डक यांनी आपल्या बहारदार गायनातून विद्यार्थ्यांची मने जिंकली.‘माणसा इथे मी तुझे गीत गावे’, ‘असे गीत गावे तुझे हित व्हावे’,‘हा थुई थुई वारा’,‘अरे सांगा मला टाटा बिर्ला’,‘सांगा ना या वेडीला’,‘चल ग हरिणी तुरुतुरु’,‘ही फियाट गाडी माझी म्हणू का’,‘नव हे नवाळीच’,‘तुफानातले दिवे आम्ही’,‘मी वादळ वारा’,‘काल मुजरेच केले रे’ यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाड्यांचे त्यांनी सादरीकरण केले. गीत आणि पोवाड्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. मनोरंजनासोबतच वामनदादा कर्डक यांच्या सामाजिक जाणिवा,समतेचा विचार आणि साहित्यिक योगदानाचा विद्यार्थ्यांना जवळून परिचय झाला. शाळेचे मुख्याध्यापक रमेश निघुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमशील शिक्षक अनिल कडलग यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय आहेर होते. अध्यक्षीय मनोगतात दत्तात्रय आहेर यांनी वामनदादा कर्डक यांच्या जीवनकार्याची आणि साहित्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या कार्याचा वामनदादा कर्डक यांच्या जीवनावर मोठा प्रभाव होता,असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक कैलास दिघे यांनी केले. तुषार फल्ले यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली. पाहुण्यांचा परिचय अनिल गाडेकर यांनी करून दिला, तर सौदामिनी सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पदवीधर शिक्षक संजय एरंडे, शिक्षिका मंदा कडलग-गायकर यांच्यासह विद्यार्थी अजिंक्य आहेर,साई पाचारणे,रिद्धी केरे,सिद्धी केरे,अन्वी पवार,दर्शन पवार,ईश्वरी पवार,स्वरा वारे,अनुष्का पवार,ज्ञानेश्वरी वारे,श्रद्धा वारे,वेदांत वारे,सानवी पवार,काव्या केरे,कार्तिक आहेर,अभिराज पवार,जयदीप पवार,मनोज पवार,हर्षल पवार,रुद्र आहेर,प्राजक्ता गायकवाड,अनन्या पवार,साईश्वरी आहेर,सार्थक वारे,कार्तिक आव्हाड आणि जीवन आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट : विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
“आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत होणारा प्रत्येक कार्यक्रम आगळावेगळा असतो. अशा कार्यक्रमांतून मनोरंजनाबरोबरच ज्ञान मिळते आणि पुढील अभ्यासासाठी उत्साह वाढतो. असे कार्यक्रम नेहमी आयोजित करावेत.”
काव्या सतीश पवार,इयत्ता पाचवी
“आजचा कार्यक्रम खूपच सुंदर झाला. सुभाष कर्डक यांच्या सुंदर गायनातून शाहीर वामनदादा कर्डक यांच्या गीतांचा, पोवाड्यांचा आणि त्यांच्या लेखणीचा परिचय आम्हाला झाला. पुढील कार्यक्रमाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”
वेदिका शरद पवार,इयत्ता सातवी