काॅंग्रेसचे जेष्ठ नेते डाॅ.रत्नाकर महाजन यांचे निधन
शिरूर:- काॅंग्रेसचे जेष्ठ नेते,राज्य नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष डाॅ.रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. डाॅ.रत्नाकर महाजन हे मूळचे इंदापूर तालुक्यातील रहिवासी होते.लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले होते. शिक्षणासाठी ते पुण्यात आले होते पुणे हीच त्यांची कर्मभूमी बनली. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड होती.समाजवाद आणि गांधीवादी विचारसरणीचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव होता. युवक क्रांती दल,राष्ट्र सेवा दल,भारत जोडो अभियान,विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य केले. आणिबाणी विरोधात त्यांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. डाॅ.राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण,एस एम जोशी,ना.ग.गोरे,ग.प्र.प्रधान या दिग्गज विचारवंतांचा सहवास त्यांना लाभला होता. १९८६ -८७ मध्ये त्यांनी इंदापूर तालुक्यात शेतकरी,वीज,पाणी, रस्त्याच्या प्रश्नांवर पदयात्रा काढली होती. युवकांमध्ये वैचारिक जडणघडण, नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी त्यांनी लोकबोधिनी संस्थेची स्थापना केली.युवक नेतृत्व शिबिर, व्याख्याने,परिसंवाद,वादविवाद,सामान्यज्ञान स्पर्धांच्या माध्यमातून त्यांनी तरूणांशी संवाद साधला.महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी दोन वेळा सांभाळली. काॅंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून त्यांनी पक्षाची भूमिका मांडली होती.शिदोरी मासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी वैचारिक लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले.