शिक्षक दिनानिमित्त 26 शिक्षक व 6 कर्मचाऱ्यांचा सन्मान
फुलगाव (गौतम पाटोळे ):- शिक्षक दिनाचे औचित्य साधून हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय,फुलगाव,ता. हवेली,जि. पुणे येथे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यालयातील 26 शिक्षक व 6 कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संत तुकाराम स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व लोकनायक जयप्रकाश नारायण ज्येष्ठ नागरिक संघ,लोणीकंद यांच्या वतीने करण्यात आले होते. संघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव भोंडवे (आण्णा) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रकाश गिरीगोसावी, बाळासाहेब ढगे,रघुनाथ आप्पा कंद,कुलाल वकील तसेच फुलगाव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव खुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील महत्त्वाचे शिल्पकार असून विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच संस्कार,मूल्ये आणि जीवनदृष्टी देण्याचे कार्य ते सातत्याने करीत असतात. शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश केकाण यांनी उपस्थित मान्यवर,आयोजक,शिक्षक व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.