‘सायमन,परत जा!’च्या धर्तीवर आता ‘साहेब,परत जा!’
‘चला शाळेत जाऊया’ अभियानासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर श्रमजीवी संघटना करणार शांततापूर्ण निदर्शने
राजू टपाल.
टिटवाळा:- राज्य शासनाच्या ‘चला शाळेत जाऊया अभियान’ अंतर्गत शाळांची पाहणी करण्यासाठी गावागावात येणाऱ्या वरिष्ठ नोडल अधिकाऱ्यांसमोर श्रमजीवी संघटना शांततापूर्ण निदर्शने करणार आहे. यावेळी ‘सायमन,परत जा!’च्या धर्तीवर ‘साहेब,परत जा!’ अशा घोषणा देण्यात येतील,अशी घोषणा श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ यांनी केली. टिटवाळा येथे झालेल्या संविधान हक्क मेळाव्यात त्या बोलत होत्या.
या मेळाव्यास श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित,कार्याध्यक्ष बाळाराम भोईर आणि सरचिटणीस विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कल्याण तालुका प्रमुख वासुदेव वाघे,सचिव सुवर्णा कोट,जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर बनसोडे,जिल्हा सचिव राजेश चन्ने,पालघर जिल्हा महिला प्रमुख रेखा पराड आणि दशरथ भालके यांनीही आक्रमक भूमिका मांडली. शासनाने ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत वरिष्ठ नोडल अधिकाऱ्यांना जिल्ह्यांमध्ये जाऊन शाळांची पाहणी तसेच तालुका आणि जिल्हास्तरीय बैठका घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र,केवळ शाळांची पाहणी करून समस्या सुटणार नाहीत,असे सांगत श्रमजीवी संघटनेने या अभियानावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘मूल शाळा सोडत नाही,भूक त्याची शाळा सोडवते!’ सीता घाटाळ यांनी शासनाच्या भूमिकेवर टीका करताना सांगितले की,“अधिकाऱ्यांना केवळ शाळेत नेण्याऐवजी वीटभट्टीवर,पाड्यापाड्यावर आणि ऊसाच्या फडावर घेऊन जा. दारिद्र्याने पिचलेल्या आदिवासी कुटुंबांची परिस्थिती त्यांना दाखवा. भुकेच्या आगीपायी लेकरांना मजुरीला पाठवणाऱ्या पालकांना भेटू द्या.”आई-वडील रोजगारासाठी स्थलांतरित झाल्यानंतर त्यांच्या मुलांचे बालपणही वीटभट्टी,ऊसतोड आणि अन्य मजुरीच्या ठिकाणी स्थलांतरित होते. त्यामुळे रिकाम्या शाळांची पाहणी करून अहवाल तयार करण्यापेक्षा मुलं शाळेबाहेर का आहेत,यामागील भूक,दारिद्र्य आणि स्थलांतराची कारणे सरकारने समजून घ्यावीत,अशी मागणी त्यांनी केली. ‘शाळेत नको साहेब—पाड्यावर चला!’ घाटाळ यांनी सरकारला आवाहन करताना,“शाळेत नको साहेब—पाड्यावर चला! वीटभट्टीवर चला! ऊसाच्या फडावर चला! भुकेच्या आणि दारिद्र्याच्या मुळाशी चला. शाळेबाहेरच्या प्रत्येक लेकराचा हात धरा आणि त्याला खऱ्या अर्थाने शाळेत घेऊन चला,”असे म्हटले. यापुढे ‘चला शाळेत जाऊया’ अभियानासाठी अधिकारी गावात आले तर श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते अहिंसक आणि शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करतील,तसेच ‘साहेब, परत जा!’ अशा घोषणा देतील,असा इशाराही त्यांनी दिला. मेळाव्यात ‘शाळांची पाहणी नको—शाळेबाहेरची मुलं शोधा!’,‘अहवाल नको—शिक्षक द्या!’ आणि ‘घोषणा नको—शिक्षणाचा हक्क द्या!’अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.