जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मानसी लांडगे डॉक्टर
आळंदी प्रतिनिधी गौतम पाटोळे
तुकाराम अर्जुन लांडगे यांच्या कन्या मानसी लता तुकाराम लांडगे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर पदवी मिळवली आहे. तिच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मानसीचे वडील तुकाराम अर्जुन लांडगे हे सामाजिक कार्यकर्ते असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करत होते. आई लता तुकाराम लांडगे या गृहिणी असून, आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आई-वडिलांच्या कष्टांना आणि प्रोत्साहनाला योग्य दिशा देत मानसीने शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केले.
मानसीचे नर्सरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण वाय.एम.सी. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल, कॉटर गेट, रास्ता पेठ, पुणे येथे झाले. शालेय जीवनापासूनच ती अभ्यासात हुशार होती. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ती नेहमीच वर्गात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिली. इयत्ता दहावीच्या परीक्षेत तिने ८६ टक्के गुण मिळवत शाळेत द्वितीय क्रमांक पटकावला.त्यानंतर तिचे अकरावी व बारावीचे शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालय (एस.पी. कॉलेज), सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे येथे पूर्ण झाले. पुढे नीट परीक्षेचा अभ्यास करून चांगले गुण मिळवल्यानंतर ऑनलाइन अर्जाद्वारे ऑल इंडिया कोट्यातून अनंतराव कणसे मेडिकल कॉलेज, आळेफाटा, नाशिक रोड येथे तिला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला.
वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही मानसीने सातत्याने अभ्यास, मेहनत आणि जिद्द कायम ठेवली. अखेर अंतिम परीक्षेचा निकाल ३ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर झाला. यामध्ये तिने १५०० पैकी ८९८ गुण मिळवत यशस्वीरीत्या परीक्षा उत्तीर्ण केली आणि डॉक्टर पदवी संपादन केली.मानसीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नगरसेवक, आमदार, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, वकील, शिक्षक, डॉक्टर, व्यावसायिक, व्यापारी व उद्योजक यांच्यासह समाजातील विविध मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करत मानसीने मिळवलेले हे यश परिसरातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.