• Total Visitor ( 714598 )
News photo

मनाच्या जखमा दिसत नसल्या तरी वेदना खोल असतात...

Raju Tapal publisher October 05, 2026 21

मनाच्या जखमा दिसत नसल्या तरी वेदना खोल असतात...





मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी आरोग्य विभागाचा पुढाकार; उपसंचालक डॉ. कैलास पवार यांचे प्रतिपादन





ठाणे : प्रतिनिधी मनाच्या जखमा दिसत नसल्या तरी त्यांची वेदना खोल असते. मानसिक आजाराशी झुंजणाऱ्या व्यक्तीला उपचारांसोबतच मायेचा हात आणि समाजाचा स्वीकार मिळणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्याबाबतचे गैरसमज दूर करून संवेदनशीलता आणि जनजागृती वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास पवार यांनी केले.



जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथे विविध जनजागृतीपर उपक्रम उत्साहात पार पडले. “अनुभवलेल्या व्यथा ऐकूया : खरे आवाज, खरा बदल” या २०२६ च्या संकल्पनेनुसार आयोजित या उपक्रमातून मानसिक आजाराचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व्यक्तींच्या व्यथा, संघर्ष आणि पुनर्वसनाचा प्रवास समाजाने समजून घ्यावा, तसेच त्यांच्या आवाजाला मानसिक आरोग्य सेवांच्या केंद्रस्थानी स्थान मिळावे, हा संदेश देण्यात आला.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसंचालक डॉ. कैलास पवार होते. त्यांच्या हस्ते जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या थीमचे अनावरण करण्यात आले. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य जनजागृती, आरोग्य शिबिरे, बाह्यरुग्ण सेवा, रॅली आणि विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक आरोग्य सेवा अधिक व्यापक, सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्य विभाग कार्यरत असून, भविष्यातही या सेवा अधिक सक्षम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.



प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मानसिक आरोग्य सेवा देणारे महत्त्वाचे केंद्र आहे. मानसिक आजाराकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे तसेच उपचारानंतर रुग्णांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, यासाठी जनजागृतीला विशेष महत्त्व असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.



वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यावेळी मार्गदर्शनपर बोलताना म्हणाले की, रुग्णांकडे केवळ रुग्ण म्हणून न पाहता कुटुंबातील सदस्याप्रमाणे मायेने, सन्मानाने आणि संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे आहे. योग्य उपचारांसोबत आपुलकीचे वातावरण मिळाल्यास रुग्णांच्या पुनर्वसनाला मोठी मदत होते.



रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात थीमवर आधारित पोस्टर प्रदर्शनातून मानसिक आजार, गैरसमज, उपचार आणि पुनर्वसनाबाबत जनजागृती करण्यात आली. व्यवसायोपचार विभागात उपचारानंतर सावरलेल्या रुग्णांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित चित्रफिती दाखविण्यात आल्या. यावेळी काही रुग्णांचा कुटुंबीयांसह गौरव करण्यात आला. योग्य उपचार, कुटुंबाचा आधार आणि समाजाचा स्वीकार मिळाल्यास मानसिक आजारातून सावरणे शक्य आहे, हा आशावादी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement