कल्याण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा...
शेतकऱ्यांचे तहसीलदार विकास गारुडकर यांना निवेदन,भातशेतीसह कडधान्यांचे मोठे नुकसान...
विलास भोईर:
खडवली :- पावसाअभावी कल्याण तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने कल्याण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना निवेदन सादर केले.
शासनाने इतर काही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. मात्र,कल्याण तालुक्याचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नसल्याने येथील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.भातशेतीचे नुकसान,शेतकरी चिंतेतयावेळी शेतकरी विश्वनाथ जाधव यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.शेतकऱ्यांनी भातशेतीची लागवड केली असून,आता भाताची लोंबे तयार झाली आहेत.मात्र,पाण्याअभावी पिकांची अपेक्षित वाढ होत नाही. आगामी तीन ते चार दिवसांत पाऊस पडला, तरी भाताचे दाणे तयार होण्यासाठी आवश्यक असलेली वाढ होईलच, याची खात्री नाही. त्यामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.भातशेतीबरोबरच चवळी,मूग,खुरासणी,वरी आदी कडधान्यांच्या पिकांनाही पावसाअभावी फटका बसला आहे. पिकांचे नुकसान आणि उत्पन्नाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.शासनाने तातडीने मदत करावी
कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. शेतीच्या नुकसानीची पाहणी करून कल्याण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.शेतकरी उपस्थित यावेळी विश्वनाथ जाधव, परशुराम पिंताबरे, रमेश बांगर, बळीराम लोणे,अॅड. मधुकर वाळिंबे,संदेश भोईर,आत्माराम जाधव आणि साईनाथ जाधव यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.