• Total Visitor ( 726190 )
News photo

दिवाळी सुट्टीतील सक्तीची शिक्षक प्रशिक्षणे रद्द करा..

Raju Tapal publisher October 13, 2026 14

दिवाळी सुट्टीतील सक्तीची शिक्षक प्रशिक्षणे रद्द करा..



प्राथमिक शिक्षक समितीची शिक्षण आयुक्तांकडे मागणी, शिक्षकांच्या वैयक्तिक व कौटुंबिक नियोजनाचा विचार करण्याचे आवाहन...



अमरावती, दि. १३ ऑक्टोबर : दिवाळीच्या दीर्घ सुट्टीत आयोजित करण्यात आलेली शिक्षकांची सक्तीची प्रशिक्षणे तातडीने रद्द करावीत,अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. शिक्षकांच्या अधिकृत सुट्ट्यांमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करून त्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक नियोजनात अडथळे निर्माण करू नयेत,अशी भूमिका समितीने घेतली आहे. यासंदर्भात राज्याध्यक्ष विजय दत्तात्रय कोंबे आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शालेय शिक्षण मंञी,शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांना निवेदन सादर केले आहे.सुट्टीतील प्रशिक्षणामुळे शिक्षकांची गैरसोय दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण असून, या कालावधीत शिक्षकांना कुटुंबीयांसमवेत वेळ घालविणे,नातेवाईकांच्या भेटीगाठी घेणे तसेच धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचे पालन करण्याची संधी मिळते. वर्षभराच्या शैक्षणिक कामकाजानंतर मानसिक विश्रांतीसाठीही ही सुट्टी महत्त्वाची असते.अनेक शिक्षकांनी या काळात प्रवास,भारतदर्शन आणि वैद्यकीय उपचारांचे नियोजन केले आहे.अशा परिस्थितीत सक्तीची प्रशिक्षणे आयोजित केल्याने शिक्षकांच्या नियोजनावर पाणी फेरले जात असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे.प्रशिक्षणाला विरोध नाही, नियोजनाला आक्षेप शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी प्रशिक्षण आवश्यक असले,तरी त्यासाठी अधिकृत सुट्टीचा बळी देणे योग्य नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. परीक्षा वेळापत्रकात झालेल्या बदलांमुळे उपलब्ध होणाऱ्या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करावे. प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य नसल्यास ऑनलाइन प्रशिक्षणाचा पर्याय द्यावा. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्यामार्फत एक दिवसाचे मार्गदर्शन करून उर्वरित कामासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.नऊ मागण्यांवर निर्णय घेण्याची अपेक्षा प्रशिक्षणासाठी यापूर्वी शुल्क भरलेल्या शिक्षकांकडून पुन्हा शुल्क आकारू नये, वैद्यकीय कारणे, पूर्वनियोजित प्रवास अथवा कौटुंबिक अडचणींमुळे अनुपस्थित राहणाऱ्यांसाठी पर्यायी सत्र आयोजित करावे,तसेच सुट्टीतील प्रशिक्षणाबाबत स्पष्ट व पारदर्शक धोरण निश्चित करावे,अशा नऊ मागण्या समितीने मांडल्या आहेत.‘प्रशिक्षणाला आमचा विरोध नाही; मात्र प्रशिक्षणाच्या नावाखाली शिक्षकांच्या अधिकृत सुट्ट्या,वैयक्तिक नियोजन आणि मानसिक स्वास्थ्य यांचा बळी देण्यास विरोध आहे,’अशी भूमिका समितीने मांडली आहे.प्रशासनाने शिक्षकांच्या अडचणींचा विचार करून प्रशिक्षणाबाबत तातडीने पुनर्विचार करावा व सुधारित आदेश निर्गमित करावेत. अन्यथा निर्माण होणाऱ्या असंतोषाची जबाबदारी प्रशासनावर राहील,असा इशाराही समितीने दिला आहे. समितीचे राज्य प्रसिद्धिप्रमुख राजेश सावरकर यांनी ही माहिती दिली.





 

Share This

titwala-news

Advertisement

Advertisement