• Total Visitor ( 741341 )
News photo

मालमत्ता कर थकबाकीप्रकरणी कॅनरा बँकेचे एटीएम सील!

Raju Tapal publisher October 23, 2026 246

मालमत्ता कर थकबाकीप्रकरणी कॅनरा बँकेचे एटीएम सील!



कल्याण-डोंबिवली महापालिकेची धडक कारवाई;वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी न भरल्याने प्रशासनाचा कठोर निर्णय



राजू टपाल.





डोंबिवली :- मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वारंवार नोटिसा देऊनही मालमत्ता कराची थकबाकी न भरल्याने महापालिकेच्या ‘फ’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाने डोंबिवली पूर्व येथील पाटकर चॅरिटेबल ट्रस्टच्या इमारतीमधील कॅनरा बँकेचे एटीएम (ATM) सील केले आहे. महापालिकेच्या अधिकृत प्रसिद्धिपत्रकानुसार, संबंधित मालमत्तेवर ४८ लाख ९२ हजार ७७७ रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी आयुक्तांनी कर विभागाला विशेष निर्देश दिले आहेत. त्यानुसार थकबाकीदारांविरोधात वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

संबंधित बँकेला थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी दोन वेळा पत्राद्वारे कळविण्यात आले होते. तसेच बँकेच्या शाखा व्यवस्थापकांची भेट घेऊनही थकबाकी भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र,त्यानंतरही बँकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

उपायुक्तांच्या निर्देशानुसार कारवाई

महापालिकेचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या निर्देशानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित एटीएम सील करण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहायक आयुक्त तथा ‘फ’ प्रभाग क्षेत्राचे अधिकारी प्रसाद ठाकूर यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. यावेळी कर अधीक्षक सर्फराज तडवी आणि कर वसुली कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. इतर थकबाकीदारांनाही इशारा मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या इतर बँका आणि मालमत्ताधारकांविरोधातही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी वेळेत कर भरून संभाव्य कारवाई टाळावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement