मनोरुग्णालयात फुलली माणुसकीची दिवाळी...
रुग्णांच्या सृजनशीलतेतून स्वावलंबनाचा प्रकाश,मानसिक आरोग्याबाबत संवेदनशीलतेचा संदेश...
ठाणे :- कुणाच्या हातात रंग,कुणाच्या कलेतून उमलते आशेचे फूल...ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांच्या सृजनशीलतेतून ‘मनाची दिवाळी’ फुलली असून,त्यांच्या कष्टांतून स्वावलंबनाचा प्रकाश आणि माणुसकीचा संदेश उजळला आहे. या रंगोत्सवातून रुग्णांच्या सुप्त कलागुणांना नवी दिशा मिळत आहे. त्यांच्या कलेचा सन्मान म्हणजे मनातील आशेला दिलेली नवी उभारी.दिवाळीनिमित्त प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या व्यवसायोपचार विभागात रुग्णांनी एक हजार मातीचे दिवे आकर्षक रंगांत सजवले आहेत. मोर आणि कमळ पणत्यांसह विविध प्रकारचे मातीचे दिवे,आकाशकंदील,तोरणे,सुगंधी उटणे,फुलवाती,अरोमा कँडल्स आणि लोकरीच्या रांगोळ्यांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे.वैद्यकीय अधीक्षक डॉ.नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विभागातील रुग्णांनी पाचशे उटण्याची पाकिटे,तोरणे,रांगोळ्या आणि अन्य वस्तू तयार केल्या आहेत.दिवाळीत या वस्तू प्रदर्शनासाठी ठेवल्या जातात आणि नागरिकही आवडीने त्यांची खरेदी करतात. आपल्या हातांनी तयार केलेल्या वस्तूंना मिळणारा प्रतिसाद रुग्णांना कौशल्याची जाणीव करून देतो, तर आर्थिक मोबदल्यातून स्वावलंबनाची उमेद मिळते. यंदा रुग्णालयाची सजावटही रुग्णांनी तयार केलेल्या आकाशकंदील, पताका आणि तोरणांनी करण्यात येणार आहे.औषधोपचारांसोबत व्यवसायोपचारातून रुग्णांची एकाग्रता, आकलनक्षमता आणि कामातील सुसूत्रता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. या उपक्रमासाठी डॉ.सुधीर पुरी,डॉ. जानवी केरझरकर,डॉ.आश्लेषा कोळी यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.व्यवसायोपचारातून रुग्णांना स्वावलंबन आणि आत्मविश्वास मिळावा,हा आमचा प्रयत्न आहे.नागरिकांनी त्यांच्या कलाकृती खरेदी करून प्रोत्साहन द्यावे.रुग्णांना प्रेम,सन्मान आणि सहकार्य देणे,हीच माणुसकीची खरी दिवाळी आहे.
— डॉ.नेताजी मुळीक,वैद्यकीय अधीक्षक,प्रादेशिक मनोरुग्णालय,ठाणे.