अजित पवार बनलेत भाजपचे जवळचे भिडू
अजितदादांचे दिल्ली दरबारी वजन वाढले;
पक्षासाठी फायदा करुन घेणार का?
राजकीय वर्तुळात चर्चा
मुंबई:- विधानसभा निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दिल्ली दरबारी वजन वाढल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिल्लीतील भाजपचं केंद्रीय नेतृत्व एक विश्वासू साथीराच्या नजरेने पाहताना दिसताहेत. त्यामुळे अजित पवार हे भाजपचे जवळचे भिडू झाल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जबरदस्त यशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच दिल्लीत राजकीय वजन वाढल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या पक्षाने तब्बल 41 जागा जिंकत बाजी मारलीय. त्यामुळे दिल्ली दरबारी महाराष्ट्रातील एक मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व म्हणून अजित दादांची चर्चा आहेत. महायुतीत सर्वात शेवटी सहभागी झालेले भिडू अजितदादा असले तरी भाजपला ते सर्वात जवळचे वाटू लागलेत. विधानसभेच्या निकालानंतर अजित पवारांनी दिल्ली दरबारी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज भासत नाहीय. मोदी आणि शाहांना भेटण्याचा त्यांनी थेट एक्सेस मिळाल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभा निकालानंतर राज्यातील भाजपचा एक विश्वासू साथीदार म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे अजित पवारांकडे पाहत असल्याचं बोललं जातंय.
विधानसभा निकालानंतर एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा येत होत्या त्यातच अजित पवार यांनी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा देत भाजप आणि फडणवीस यांचाही विश्वास संपादन केला. त्याचा प्रत्यय शपथविधीच्या दिवशी सर्वांनाच आला. अमित शहा, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे शपथविधी दिवशी एकत्र गप्पा मारताना पाहायला मिळाले. तर एकनाथ शिंदे काहीसे बाजुला पडल्याचं पाहायला मिळत होतं. विधानसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पावर कमी केली.शिवसेना नेते रामदास कदम यांनी याबाबत जाहिर वक्तव्यही केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेही भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाचा अजित पवारांवर विश्वास दृढ झालाय. दिल्ली दरबारी वजन वाढल्यानंतर अजित पवार यांनी एक एक गोष्ट आपल्या पदरात पाडून घ्यायला सुरूवात केलीय. आता प्रफुल्ल पटेलांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी अजित पवार प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे दिल्लीत वाढलेल्या वजनाचा फायदा करून पटेलांच्या पदरातही एखादं केंद्रीय मंत्रिपद पडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.