'लाडकी बहीण' योजनेच्या सर्व अर्जांची छाननी होणार;
Raju tapal
December 10, 2024
53
'लाडकी बहीण' योजनेच्या सर्व अर्जांची छाननी होणार;
वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आदिती तटकरेंची घोषणा
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनं मोठा विजय मिळवून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत योजनेतून पडताळणीबाबत संकेत देत जे अर्ज निकशात बसत नाहीत ते बाद केले जातील असे म्हटले होते.यानंतर आता या योजनेच्या पडताळणीवरून जोरदार टीका होत आहे. दरम्यान राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणूक निकालांना 'कलाटणी' देणाऱ्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेलाच कलाटणी मिळणार आहे.अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी असून त्यामुळे आता अर्जांची छाननी केली जाणार आहे.छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील, अशी माहिती माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. यामुळे १५ ते २० टक्के, म्हणजे ३५ ते ५० लाख महिलांना लाभावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारच्या शपथविधी सभारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लाडकी बहीण योजना' कायम राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच आर्थिक नियोजनात योग्य प्रकारे सुसूत्रता आल्यानंतर वाढीव हप्ता दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी निकषाबाहेरील महिला योजनेचा गैरफायदा घेत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याची माहिती आहे. त्यामुळे अर्जांची छाननी सुरू करण्यात आली असून २ कोटी ३४ लाख लाभार्थींपैकी १५ ते २० टक्के महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
प्रारंभी कुटुंबातील केवळ एका महिलेसाठी असलेली ही योजना नंतर मतांच्या बेगमीसाठी २१ ते ६५ वय असलेल्या कुटुंबातील सर्व महिलांसाठी लागू करण्यात आली. महिलेचे बँक खाते आणि कुटुंबाचे एकूण उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी या दोन प्रमुख अटी होत्या. राज्यातील पात्र वयोगटातील चार कोटी ७ लाख महिला मतदारांपैकी दोन कोटी ४७ लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. राज्य सरकारने या योजनेसाठी एकूण ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. निवडणूक काळात अर्ज दाखल केलेल्या १३ लाख महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच लाभार्थींना डिसेंबरचा हप्ता देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली जाईल.
10 लाख रुपयांचे उत्पन्न घेणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. खऱ्या गरजवंतांनाच रक्कम मिळावी, या उद्देशाने पुढील तीन महिन्यांत अर्जांची छाननी केली जाईल आणि अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची नावे योजनेतून वजा केली जातील, अशी माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
लाडकी बहीण योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत आहेत. आता अर्जांची छाननी केली जाईल. त्यात अनियमितता आढळल्यास त्या लाभार्थीला बाद केले जाईल.
आदिती तटकरे, माजी महिला व बालकल्याण मंत्री
दरम्यान निवडणुकीच्या निकालानंतर तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे सरकार लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळेच आल्याचे म्हटले होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांनी देखील लाडक्या बहिणींमुळे महायुती पुन्हा सत्तेत आल्याचे म्हटले होते.तसेच फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत लाडकी बहिण योजनेवरून माहिती दिली होती. तसेच योजनेतील अर्जांच्या छाननीवरून माहिती देताना, राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरूच राहणार आहे. तर आम्ही दिलेल्या वचना प्रमाणे २१०० रूपये दिले जातील. पण आता या योजनेबाबत काही तक्रारी आल्या असून अर्जांची छाननी केली जाईल, असे म्हटले होते.
कोणते असतील निकष?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, चारचाकी वाहन, पाच एकरपेक्षा अधिक जमीन, एकच महिला लाभार्थी दुसरी कोणती शासकीय योजनेचा लाभ घेते का? एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक या योजनेत आहेत का? याचा शोध घेतला जाणार आहे.
संजय राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने योजनेद्वारे बहिणींनी पैसे दिले. आता याच योजनेची पडताळणी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पण आमचे या योजनेवर बारीक लक्ष असून ज्यांना पैसे दिले आहेत, त्यांचे पैसे काढून घेऊ नका. योजना कशासाठी सुरू केली. १५०० देऊन बहिणींची मते विकत घेतली. आता पडताळणीच्या नावाखाली महिलांना योजनेपासून वंचित ठेवू नका असा हल्लाबोल राऊत यांनी महायुती सरकारवर केला आहे.
Share This