• Total Visitor ( 435196 )
News photo

अलमट्टी उंचीविरोधात कोल्हापुरात रविवारी सर्वपक्षीय मेळावा

Raju tapal May 09, 2025 57

अलमट्टी उंचीविरोधात कोल्हापुरात रविवारी सर्वपक्षीय मेळावा ! 



कोल्हापूर :- कर्नाटक राज्य शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका वाढला आहे. कर्नाटक शासनाचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी रविवारी दुपारी एक वाजता सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. खासदार, आमदारांसह सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.



त्यांनी सांगितले की, अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत नेमलेल्या लवादानेही उंची वाढवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे, त्याचा अहवाल प्रसिद्ध करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. कर्नाटक शासन उंची वाढवण्यावर ठाम असून, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने हे काम थांबले आहे. कोणत्याही परिस्थितीत धरणाची उंची वाढवू देणार नाही, त्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली जाईल. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी सांगितले.



मेळाव्याला खासदार शाहू छत्रपती, धैर्यशील माने, धनंजय महाडिक यांच्यासह बाधित तालुक्यांतील आमदार, कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्स, ग्रीन मर्चंट असोसिएशन, कोल्हापूर धान्य व्यापारी संघटना, शेतकरी संघटना, सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.



पाणीसाठा भीतिदायक



अलमट्टी धरणाची सध्या १२५ टीएमसी पाणी साठा क्षमता आहे. धरणाची उंची ५ मीटरने वाढवल्यानंतर ही क्षमता ३०० टीएमसीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे महापुराची शक्यता, भीती अधिकच वाढणार असल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले.



दुष्काळ छाया गडद



अलमट्टी धरणाची उंची वाढल्याने पावसाळ्यात पाण्याची तुंबी वाढून काेल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराची भीती आहे. दुसरीकडे तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्याला पावसाळ्यातील वाट्याचे पाणी धरणातच राहिल्याने दुष्काळाची भीती सतावत आहे. यावेळी, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील-भुयेकर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टे, चंद्रकांत पाटील, सखाराम चव्हाण, मारुती पाटील उपस्थित होते.



महापुराचा धोका



पंचगंगा, कृष्णा नदीला २००५, २००१९, २०२१ साली आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात हाहाकार उडाला. अनेकांचे प्राण गेले, अनेकांचे संसार उघड्यावर पडले, हजारो एकर शेतीचे नुकसान झाले. या प्रत्येक महापुरावेळी कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी हे धरण कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्राकडून करण्यात आला. कर्नाटकाकडून अलमट्टी धरणातून पाणी न सोडण्यात आल्याने कृष्णेच्या पाण्याचा फुगवटा वाढत जाऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याचा दावा महाराष्ट्राकडून करण्यात आला. मात्र आता कर्नाटक सरकारने ते या धरणाच्या भिंतीची उंची ५१९ मीटरवरून आणखी पाच मीटरने वाढवून ५२४ मीटर करणार असल्याचे जाहीर केले आहे.



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement