लातूरच्या वृद्ध शेतकऱ्यानं स्वत:लाच जुंपलं औताला;
व्हिडीओ पाहताच अभिनेता सोनू सूद धावला मदतीला;
म्हणाला, तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो
मुंबई :- एकीकडे सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असताना अजूनही राज्यातील असंख्य शेतकरी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. याचंच ताजं उदाहरण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातून समोर आलं आहे. शेत नांगरणीसाठी बैल नसल्याने एका वृद्ध शेतकऱ्याने स्वत:लाच औताला जुंपलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संबंधित शेतकऱ्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून नांगरणीसाठी त्यांच्याकडे बैलसुद्धा नाही. अशा परिस्थितीतही हार न मानता हा वृद्ध शेतकरी स्वत:ला औताला जुंपला आहे. शेतकरी दाम्पत्याचं हे कष्ट पाहून अखेर अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. गरजूंची मदत करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोनू सूदने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
शेतकऱ्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोनू सूदने त्यांना मदत करण्याचं ठरवलं आहे. ‘तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो’, असं ट्विट त्याने केलं आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनही सक्रिय झाले. लातूरचे तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी वृद्ध अंबादास पवार यांच्या शेतावर भेट दिली. त्यांच्याकडे कोरडवाहू जमीन असून, शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री नाही, हे निदर्शनास आलं. कृषी विभागाकडून त्यांना सबसिडीवर उपकरणे व ट्रॅक्टर देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.अंबादास पवार यांच्याकडे कृषी ओळखपत्र नसल्याने त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
लवकरच त्यांना 1.25 लाख रुपयांपर्यंत अनुदान आणि शेतीसाठी आवश्यक साधनं मिळणार आहेत, अशी माहिती देखील कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी दिली आहे. शेतकऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. एक 75 वर्षीय वृद्ध शेतकरी स्वतः नांगर ओढत असून, त्यांच्या पत्नी मागून तो नांगर हाताळताना दिसत आहेत. त्यांच्याकडे शेतीसाठी बैल किंवा अन्य कोणतेही यंत्र उपलब्ध नसल्याने, त्यांनी स्वतःच शेताची नांगरणी करण्याचा निर्णय घेतला. या दृष्याने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, शेतीची कामे करण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे वृद्ध जोडपं स्वतःच्या श्रमावर शेत नांगरत होते.