अंगणवाडी सेविकांसाठी १२वी उत्तीर्णची अट !
Raju Tapal
January 17, 2023
113
अंगणवाडी सेविकांसाठी १२वी उत्तीर्णची अट ! २६ जानेवारीनंतर २० हजार पदांची भरती
राज्यातील एक लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून २० हजार पदांची भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या 'पोषण २.०'अंतर्गत आता पदभरतीसाठी दहावी नव्हे तर बारावी उत्तीर्ण महिलांनाच संधी मिळणार आहे.मदतनीस पदासाठी सातवी उत्तीर्णची अट कायम राहणार आहे.२६ जानेवारीनंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
अंगणवाडी सेविका होण्यासाठी पूर्वीपासून दहावी उत्तीर्ण अशी अट होती. परंतु, अंगणवाड्यांमधील ७५ लाख विद्यार्थ्यांची दररोज 'पोषण ट्रॅकर' ॲपद्वारे माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता सेविकांच्या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक असेल. त्यासंबंधीचा शासन निर्णय झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे. ३० जानेवारीपूर्वी मदतनीस महिलांना शैक्षणिक पात्रतेनुसार सेविकापदी पदोन्नती दिली जाणार आहे. त्यानंतर इतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी, त्यांची यादी प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती मागविण्यासाठी किमान २० ते २५ दिवस लागणार आहेत. विधवा, जातसंवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता, यावरून संबंधित पात्र उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी (मे २०२३ पूर्वी) अंगणवाड्यांमधील २० हजार पदांची भरती केली जाईल, अशी माहिती एकात्मिक बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बारावी उत्तीर्ण महिला, तरुणी सेविका म्हणून रुजू झाल्यास 'पोषण ट्रॅकर'वर माहिती सहजपणे भरतील. मुलांच्या शिक्षणाकडेही विशेष लक्ष राहील आणि कुपोषण कमी होण्यास मदत होईल, हा शैक्षणिक पात्रता वाढीमागील हेतू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
वशिलेबाजी झाल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाई
शिक्षक होण्याचे स्वप्न पाहून 'डीटीएड' केले, पण नोकरभरती नसल्याने ते स्वप्न अर्धवटच राहिले आणि अनेक मुलींचे विवाह झाले. राज्यात अशा लाखो तरुणी असून, त्यांना नोकरीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे अंगणवाडी मदतनीस किंवा सेविका होऊन गावातच नोकरी करता येईल, या उद्देशाने आता पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणी तथा महिलांची संख्या अंगणवाडी भरतीत सर्वाधिक दिसेल, हे निश्चित आहे. त्यांनी आतापासूनच कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यात ४५० मदतनीस व २२७ सेविकांची पदे रिक्त आहेत. सध्या पदोन्नतीस पात्र मदतनिसांची यादी केली जात आहे. भरतीत कोणतीही वशिलेबाजी चालणार नाही, पारदर्शीपणे निवडी होतील. गैरप्रकार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यास सेवेतून घरी बसावे लागणार आहे.
राज्यातील अंगणवाड्यांची सद्य:स्थिती
एकूण अंगणवाड्या
१,०९,९९७
विद्यार्थी संख्या
७४.७९ लाख
सेविका, मदतनीस रिक्त पदे
२०,०९८
पदभरतीला प्रारंभ २६ जानेवारीनंतर
Share This