पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हाच यापुढील काळात सर्वांचा प्राधान्यक्रम असायला हवा - डॉ. रमेश शेलार
तळेगाव ढमढेरे येथील महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
शिरूर :- पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हाच यापुढील काळामध्ये आपल्या सर्वांचा प्राधान्यक्रम असायला हवा असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. रमेश शेलार यांनी केले.
तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्या सहकारी बँक आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय वाबळे, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख रवींद्र भगत, डॉ. पराग चौधरी, क्रीडा संचालक डॉ. अमेय काळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
डॉ. शेलार पुढे म्हणाले की, दिवसेंदिवस पर्यावरणाची होणारी हानी आपल्या सर्वांच्याच चिंतनाचा विषय आहे. जागतिक तापमान वाढ आता आपल्या अंगणात आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील वाढती उष्णता रोखण्यासाठी आपण सर्वांनी पर्यावरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही डॉ. शेलार यांनी सांगितले. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या वापरामध्ये प्लॅस्टिकचा होत असलेला वाढता वापर धोकादायक असून आपण सर्वांनी वेळीच हे संकट ओळखायला पाहिजे. निसर्गाचा समतोल राखणे हीच यापुढील आपल्या सर्वांची प्राथमिकता असायला हवी असे आग्रही मतही डॉ. रमेश शेलार यांनी व्यक्त केले.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील सर्वच जबाबदार घटकांनी आपली जबाबदारी वेळीच ओळखायला हवी असल्याचेही ते म्हणाले.
महाविद्यालयीन युवकांनी निसर्गाशी मैत्री करणे काळाची गरज असल्याचे डॉ. रमेश शेलार यावेळी म्हणाले.
सर्व जगामध्ये पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास या पुढील काळामध्ये आपल्या सर्वांचा प्राधान्यक्रम असायला हवा असल्याचे डॉ. शेलार यांनी याप्रसंगी सांगितले. महाविद्यालयीन जीवनातच उच्च ध्येय ठेवून युवकांनी व्यक्तिमत्व विकास करावा. सामजिक बांधिलकीचे तत्व युवकांनी जीवनात अंगीकारावे असे आग्रही प्रतिपादन डॉ. रमेश शेलार यांनी यावेळी केले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. पर्यावरण जनजागृतीसाठी सर्वच नागरिकांनी जबाबदारीने वागायला हवे. वसुंधरा रक्षण हाच यापुढील काळात आपल्या सर्वांचा मुख्य अजेंडा असायला हवा असे अरविंददादा ढमढेरे यांनी सांगितले. समाजात चांगले आणि विधायक कामासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिक त्रास होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महेशबापू ढमढेरे यांनी युवकांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि समाज सुधारकांनी दाखवलेला आदर्श विचारच आपल्याला तारणार आहेत. समाजाचे सामजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे काम काही प्रवृत्ती सध्या करत आहेत. अशा परिस्थितीत फक्त युवकच काही विधायक कार्य करण्यासाठी आशेचा किरण असल्याचे महेशबापू ढमढेरे यांनी यावेळी सांगितले. दिवसेंदिवस ओझोन वायूचा होत असणारा ऱ्हास आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे सर्वांनीच पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे महेशबापू म्हणाले. वर्षभरातील महाविद्यालयातील विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिके प्राप्त केलेल्या विद्यार्थाचे त्यांनी अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जून मुसमाडे यांनी स्वागत आणि प्रास्तविक केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आता यापुढील काळात ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. युवकांनी याकडे आव्हान म्हणून न पाहता संधी म्हणून पहायला हवे असल्याचे डॉ. मूसमाडे यावेळी म्हणाले. आंतरविद्याशाखीय शैक्षणिक प्रणालीमध्ये आता आपल्याला विविध शैक्षणिक संधी प्राप्त झाल्या असल्याचे ते म्हणाले. महाविद्यालयाच्या वतीने राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा प्राचार्य डॉ.अर्जून मुसमाडे यांनी घेतला.
सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय वाबळे यांनी यावेळी वार्षिक अहवाल वाचन केले. उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी यांनी सूत्रसंचालन तर डॉ. रवींद भगत यांनी आभारप्रदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे यांनी त्यांचे वडील हरिभाऊ गणपत मुसमाडे यांच्या स्मरणार्थ यावर्षीपासून महाविद्यालयातील दोन आदर्श विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली आहे. त्यानुसार तृतीय वर्ष कला या वर्गातील विद्यार्थी पांडुरंग सुरेश अहिवळे आणि तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गातील विद्यार्थिनी प्रिती मंगेश सावंत यांना यंदाचे आदर्श विद्यार्थी हे पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
महाविद्यालयातील विविध विभागांनी आयोजित केलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले अशा विद्यार्थ्यांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे (शिरूर जि.पुणे)