पुण्यात जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू; रुग्णांची संख्या १७३ वर पोहचली
पुणे :- पुण्यात गुलेन बॅरे सिंड्रोमच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात ६२ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहा झाली आहे. राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्याही १७३ वर पोहोचली आहे.
पुण्यातील रुग्णालयात 63 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसने बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. मृत व्यक्ती कर्वेनगरमधील रहिवासी होती. 28 जानेवारीला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ताप, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास होता. त्यांना आयव्हीआयजी इंजेक्शन देण्यात येत होते. बुधवारी अस्वस्थ वाटू लागले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जीबीएसमुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ४ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये गेल्या २४ तासांत नव्याने जीबी सिंड्रोम आजाराची लागण झालेले तीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या १७३ वर पोहोचली आहे. मागील तीन दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असून, गुरूवारी १० रुग्ण बरे झाले. पुणे शहर आणि जिल्ह्यात १७० संशयीत जीबीएस बाधित रुग्णांपैकी १४० रुग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. जीबी सिंड्रोम बाधितांमध्ये ३४ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून, सर्वाधिक रुग्णसंख्या ८७ ही समाविष्ट गावातील आहे. २२ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, २२ रुग्ण पुणे ग्रामीण तर ८ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत. उपाचारासाठी दाखल रुग्णांपैकी ५५ रूग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असून २१ रूग्ण व्हेंटीलेटर वर आहेत.