• Total Visitor ( 134415 )

करुणा शर्मांनी टाकला आणखी एक डाव, धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात

Raju tapal January 11, 2025 48

करुणा शर्मांनी टाकला आणखी एक डाव,
धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात,
प्रकरण थेट हायकोर्टात!

बीड - जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची अडचण आणखी वाढली आहे. आता करुणा शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धनंजय मुंडे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. यामध्ये मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता आणि प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

करुणा शर्मा यांच्या याचिकेत म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांनी पहिल्या पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा उल्लेख टाळला आहे. त्याचप्रमाणे, त्यांच्या विरुद्ध असलेल्या प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांची माहितीही निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली नाही. शर्मा यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितले की, मुंडे यांनी कायदेशीर पत्नीच्या मालमत्तेचा उल्लेख न करता फक्त त्यांच्या मुलांचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. कराडवर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराडसह आणखी चार जणांना अटक झाली आहे. या प्रकरणात सुरुवातीला सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये आणखी दोन आरोपींची नावे समोर आली आहेत.

9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या शरीरावर 56 जखमा आढळून आल्या, ज्यामध्ये 41 इंचाचा लोखंडी पाइपसह विविध शस्त्रांचा वापर करण्यात आला होता.

Share This

titwala-news

Advertisement