बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’
जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
नवी मुंबई :- हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी खारघर,नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाची आरम्भता की ‘अरदास’ संत समाजचे प्रधान संत ज्ञानी हरनाम सिंघ जी,मुखी दमदमी टकसाल यांच्या हस्ते ओवे मैदान,सेक्टर 29,खारघर,नवी मुंबई येथे करण्यात आली. अल्पसंख्याक विकास विभाग,राज्य समन्वय समिती आणि सिख, सिकलगर,बंजारा,लबाना,मोहयाल,सिंधी,वाल्मिकी,उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय अशा नऊ समाजाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, लाखोंच्या संख्येने भाविक राज्य तसेच देशातून उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त विजय सूर्यवंशी,सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल,नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे,नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे,ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ,उपजिल्हाधिकारी रविंद्र राठोड,सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजा दयानिधी,सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख,सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे,पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे,अपर आयुक्त फरोग मुकादम,उपायुक्त विजय म्हसाळ,पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते,रश्मी नांदेडकर,वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे,हिंद दी चादर कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक,क्षेत्रिय आयोजन समिती, नवी मुंबईचे अध्यक्ष अमरपाल सिंघ रंधावा, सुप्रीम कॉन्सील,नवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जअसाल सिंग सिद्धू,खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बल,महाराष्ट्र राज्य सिख समन्वय समितीचे चरणदीप सिंग (हॅप्पी सिंग),राज्यस्तरीय समितीचे निमंत्रक तथा महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष बल मिलकित सिंग,नवी प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांच्यासह शीख, सिकलगर,बंजारा,लबाना,मोहयाल,सिंधी,वाल्मिकी,उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय समाजातील प्रतिनिधी उपस्थिती होते. संत ज्ञानी हरनाम सिंघजी यांनी ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या बलिदानाविषयीचे माहात्म्य सांगितले. पुढील पिढीपर्यंत श्री गुरु तेग बहादूर यांच्या शौर्याचा इतिहास पोहचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून शहादतविषयी जागर करणे का महत्वाचे आहे, याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन दिले. नागपूर आणि नांदेड या ठिकाणी "हिंद दी चादर" या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रशासनाच्या सहकार्याची खूप मोठी जोड होती. आणि आज खारघर,नवी मुंबई येथे देखील आजच्या आरंम्भता की "अरदास" कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या उत्साहातून हे स्पष्ट होत आहे की,येथील कार्यक्रम देखील खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्याने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, खारघर येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीद जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कार्यक्रमासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून तयारी महिनाभरापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. रायगड व ठाणे जिल्हा प्रशासनाने 25 समित्यांची स्थापना करून विविध जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. नागपूर आणि नांदेड येथील यशस्वी कार्यक्रमांनंतर आता खारघर येथील कार्यक्रमाकडे देश-विदेशातील भाविकांचे लक्ष लागले आहे.कार्यक्रमासाठी प्रशासन,पोलीस व महानगरपालिका यंत्रणा समन्वयाने दिवसरात्र कार्यरत असून भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सूर्यवंशी यांनी दिली. गुरु नानक नामलेवा समिती,शीख समुदाय तसेच विविध समाजघटकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात पार पडणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. "हिंद दी चादर" कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी गुरु तेग बहादूरजी यांच्याशी लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय यांच्याशी निगडीत असलेला इतिहास सांगितला. तसेच त्यांनी नागपूर आणि नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्व समाजबांधवांनी नि:स्वार्थ सेवाभाव ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.