• Total Visitor ( 428886 )
News photo

प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा

Raju tapal June 04, 2025 75

प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा



पर्यावरण आणि मानव यांचे नाते म्हणजे मायलेकाच्या नात्यासारखे आहे.पर्यावरणाशिवाय मानव आपले जीवन जगू शकत नाही.पर्यावरणाच्या संदर्भात लिहायचे म्हटले तर कागदावर लेखणीने उतरवावा एवढा साधा सोपा विषय तो नक्कीच नाही.कारण पर्यावरणाचे अनेक पैलू आहेत.एक एक पैलू उलगडत गेलो तरी कित्येक दिवस आपण त्याच्या गाभाऱ्यात जाऊ शकणार नाही आणि सत्यतेचे दर्शन आपल्याला सहजासहजी होणार नाही . तरीही ५ जून,जागतिक पर्यावरण दिवस याच्या निमित्ताने थोडेसे,पर्यावरण दिनाचा इतिहास जर आपण बघितला तर 1972 मध्ये स्वीडन मधील स्टॉक होम येथे संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण परिषद झाली होती आणि याच परिषदेच्या स्मरणार्थ 1973 मध्ये पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला होता.पर्यावरण निसर्गाने माणसाला दिलेली अमूल्य देणगी आहे.पर्यावरण म्हणजे आपण ज्या परिसरात राहतो यात जैविक घटक आणि अजैविक घटकांचा समावेश होतो.जैविक घटकांमध्ये मानव प्राणी आणि वनस्पती यासारख्या सजीव घटकांचा समावेश होतो आणि दगड,माती,प्रकाश,हवामान,पाणी यासारखे घटक अजैविक म्हणून ओळखल्या जातात .मुळात माणसाचा जन्म आणि मृत्यू या दोन्ही घटना मातीशी संबंधित आहे.माणसाचा जीवन जगताना प्रत्येक ठिकाणी मातीशी संबंध येतोच .कारण आपलं जगणं तिच्या भरवशावर आहे.ऑक्सिजन ज्याची आपल्याला गरज आहे तो झाडापासून मिळतो आणि झाडे हे मातीतच रुजतात, उगवतात. अन्नाची गरज या वनस्पतीच पूर्ण करू शकतात .म्हणूनच आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीलाही आपल्यासारखेच जगू द्या तिच्यामुळेच आपण जिवंत आहोत याचे भान सुद्धा आपण ठेवले पाहिजे,पण दिवसेंदिवस पर्यावरणाचे धोके वाढताना दिसत आहे आणि या पर्यावरणाच्या वाढत्या धोक्यांबद्दल लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने आणि या धोक्यांमुळे होणाऱ्या नुकसानाला टाळता येण्याच्या उद्देशाने 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जात असतो .या दिनाच्या निमित्ताने का होईना आजच्या पालकांनी आपण स्वतः या दिनाचे महत्त्व जाणून घेऊन वृक्षारोपण करून आपल्या पुढच्या पिढीला वसा देण्याचे कार्य हाती घेतले पाहिजे कारण प्रत्येक मूल हे अनुकरणातून शिकत असतं हे आपणास माहिती आहे .त्यानिमित्त थोडेफार का होईना मोबाईलच्या दुनियेमध्ये गुंतलेले बालक बाहेर पडतील . त्यांना निसर्गाची ओळख करून द्यावी लागेल आणि निसर्गाची किमया जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये आपल्याला निर्माण करावी लागेल कारण आपणास माहिती आहे निसर्ग जगला तरच मानव जगेल .म्हणून प्रत्येकाने आज प्रयत्नपूर्वक पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे गरजेचे झाले आहे . पर्यावरण वाचवायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त प्रदूषणास आळा बसणाऱ्या गोष्टींचा वापर वाढवावा लागेल.जसे कीआपला परिसर प्लास्टिक मुक्त  करायचा असेल तर प्रत्येकाने घरातून निघताना आपल्या सोबत आपली एक पाण्याची बॉटल आणि कापडी पिशवी घेऊन निघावं जेणेकरून प्लास्टिकचा कमी वापर केला जाईल .अशी जर सुरुवात प्रत्येकाने केली तर प्लास्टिकचा वापर आपोआप टाळल्या जाईल .याशिवाय थर्माकोल सारख्या वस्तू ज्यांचे विघटन होण्यास बराच कालावधी निघून जातो असल्या वस्तू न वापरण्यास स्वतःपासून सुरुवात करा आणि शासनास ग्रो ग्रीन साठी सहकार्य करा . या दिवसाच्या निमित्ताने का होईना प्रत्येकाने एक तरी झाड लावा .त्या झाडाचे संगोपन करून त्याला वाढवा .मूलं जेव्हा हे बघतील तेव्हा ते सुद्धा अनुकरण करतील म्हणूनच म्हणू इच्छिते " उन्हातानात हवी असेल सावली , तर वृक्ष लावा पावलोपावली "



            सौ वनिता अ .बोरोडे (विशि )

           जि.प उच्च प्रा शाळा, नांदुरा बु

पं.स.अमरावती

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement