मारकडवाडीत बॅलेट पेपरवर होणारी मतदान प्रक्रिया रद्द
Raju tapal
December 03, 2024
25
प्रशासनाचा दबाव;
मारकडवाडीत बॅलेट पेपरवर होणारी मतदान प्रक्रिया रद्द
सोलापूर:- विधानसभा निवडणुकीमध्ये कोणतीही ‘लाट’ नसतानाही महायुतीला पाशवी बहुमत मिळाले. यामुळे अनेक उमेदवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. काहींनी फेरमतमोजणीसाठी अर्ज भरत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणीही केली. त्यामुळे राज्यात ईव्हीएम विरुद्ध बॅलेट पेपर असा सामना रंगला.अशातच माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएमची पोलखोल करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव केला. मंगळवारी ही मतदान प्रक्रिया पार पडणार होती. मात्र प्रशासनाच्या दबावामुळे ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार उत्तम जानकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
विधानसभा निवडणुकीत माळशिरसमधून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर हे 13 हजाराच्या मताधिक्यांनी विजयी झाले. जानकर यांनी भाजपचे उमेदवार राम सातपूते यांचा पराभव केला. मात्र, जानकर यांचा अल्पमतातील हा विजय मारकडवाडी ग्रामस्थांना मान्य नाही. जानकर एक लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून येणे ग्रामस्थांना अपेक्षित होते. जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएमचे कटकारस्थान असल्याचा ग्रामस्थांना संशय असून मारकडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने 80 टक्के मतदान झालेले असताना ईव्हीएमची आकडेवारी वेगळीच येत असल्याने गावकऱ्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे ईव्हीएमची पोलखोल करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पुन्हा राबवण्याचा निर्णय घेतला होता.
मतदानाची शहानिशा करण्यासाठी जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला होता. यासाठी लागणाऱ्या मतपत्रिका छापण्यात आल्या होत्या. मात्र पोलीस प्रशासनाने एक जरी मतदान झाले तर साहित्य जप्त करून सर्वांवर गुन्हे दाखल करू असा इशारा दिला. त्यानंतर उत्तम जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.
माध्यमांशी बोलताना उत्तम जानकर म्हणाले की, आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा तयारी पूर्ण केली होती. मात्र पोलीस प्रशासनाने एक जरी मतदान झाले मतपेटी, मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करू, तसेच सर्वांवर गुन्हे दाखल करू असे म्हटले. त्यामुळे सर्व ग्रामस्थांशी चर्चा केली. मतदानच करू देणार नसतील तर झटापट, गोंधळ होईल आणि लोक निघून जातील. प्रशासनाच्या भूमिकेमुळे मतदान थांबवण्यात आले असून येत्या 8-10 दिवसात प्रांत कार्यालय किंवा जिथे न्याय मागण्याचे ठिकाण असेल तिथे 25-30 हजार लोकांना आक्रोश पोहोचवण्याचे काम करू. न्याय मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही.
मारकडवाडीत जे मतदान होते त्यापैकी 1400 मते मला, तर 504 मते समोरच्या उमेदवाराला होणार होते. याबाबत मी सर्व अभ्यास केला होता. मात्र समोरच्या उमेदवाराला 1003 मते दाखवण्यात आली. ईव्हीएममुळे हे झाले असून आम्ही दिलेले मत उत्तम जानकर यांना न होता दुसऱ्याला कसे गेला हा प्रश्न गावकऱ्यांना होता. त्याची पडताळणी करण्यासाठी शासनाने सहकार्याची भूमिका घ्यायला हवी होती. मात्र पोलिसांनी 144 कलम लावत जमावबंदीचे आदेश दिले. तसेच मतदान साहित्य जप्त करण्याचा इशारा दिला. प्रशासनानेच ही भूमिका घेतल्यावर न्याय मागायचा कसा? असा सवाल उत्तम जानकर यांनी केला.
Share This