अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उत्तर पुणे विभाग जिल्हाध्यक्षपदी बापूसाहेब काळे
शिरूर :- पंचायत राज विकास मंच, अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उत्तर पुणे विभाग जिल्हाध्यक्षपदी शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र निमगाव म्हाळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब काळे यांना दिले आहे.
नियुक्तीपत्रात असे म्हटले आहे, आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान पाहता आपण इतर गावांतील सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना योग्य ते मार्गदर्शन कराल अशी खात्री आहे.
गावगाडा चालवणा-या या आपल्या सहका-यांना संघटीत करून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या विकासात्मक,रचनात्मक कार्यात त्यांना सहभागी करून घ्याल अशी आशा आहे. म्हणूनच आपली अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उत्तर पुणे विभाग जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.
संघटनेच्या ध्येयधोरणानूसार कार्यरत राहून सहकार्य कराल ही अपेक्षा आहे असे नियुक्तीपत्रात म्हटले असून पुढील वाटचालीस शुभेच्छाही नियुक्तीपत्रात दिल्या आहेत.
आपल्या नियुक्तीबाबत "टिटवाळा न्यूज" ला प्रतिक्रिया देताना अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उत्तर पुणे विभाग जिल्हाध्यक्षपदी नव्यानेच नियुक्ती झालेले, निमगाव म्हाळुंगी गावचे विद्यमान सरपंच बापूसाहेब काळे म्हणाले, आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळे माझी पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मोरे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रदीप माने, महिला पुणे जिल्हाध्यक्ष तथा चिंचोशीच्या सरपंच उज्वला ताई गोकुळे या सर्व पदाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रसिद्ध निवेदक प्रा.डाॅ.सुनील धनगर, भाजपा शिरूर तालुका माजी सरचिटणीस गोरक्ष काळे, दिलीप चव्हाण, ह.भ.प.ईश्वर महाराज डुबे, विक्रम साकोरे, बाबुराव चौधरी यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.
सर्व पदाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्व सरपंचांना योग्य न्याय देण्याचे काम करून प्रत्येक गावाचा अधिक चांगल्या प्रकारे विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे असे बापूसाहेब काळे यांनी नियुक्तीबाबत सांगितले.
प्रतिनिधी:- पत्रकार विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )