भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांना हायकोर्टाचा मोठा दणका,
बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याचा एसीबीला आदेश
मुंबई - सोलापूर जिह्यातील बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राजेंद्र राऊत व त्यांच्या कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेची सखोल चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करून त्या चौकशीचा अहवाल सादर करा, असे आदेश न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले आहेत.
राजेंद्र राऊत व त्यांच्या कुटुंबीयांनी अवैध मार्गाने कोट्यवधींची मालमत्ता जमवली आहे. या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याबाबत निर्देश द्या, अशी मागणी करीत भाऊसाहेब आंधळकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाने राजेंद्र राऊत व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आंधळकर यांनी सुरुवातीला 14 मार्च 2021 रोजी एसीबीसह अंमलबजावणी संचालनालय (ईडी), प्राप्तिकर विभाग आदी 17 यंत्रणांकडे तक्रार केली होती. मात्र कुठल्याच यंत्रणेने तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
प्रतिज्ञापत्रात लपवाछपवी
राजेंद्र राऊत व त्यांच्या कुटुंबीयांकडे ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता आहे. त्यांनी बेकायदेशीर मार्गाने कोटय़वधी रुपयांची मालमत्ता जमवली आहे. मात्र राजेंद्र राऊत यांनी विधानसभा निवडणुकीत अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली. या माध्यमातून बेहिशेबी मालमत्तेची लपवाछपवी केली,असा आरोप याचिकाकर्ते आंधळकर यांनी केला आहे.