भाजपा-शिवसेना युती तोडायला लावणारे खरे 'मास्टरमाइंड' एकनाथ शिंदेच ?
संजय राऊतांचं सूचक विधान
मुंबई:-शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. संजय राऊतांमुळे भाजपासोबतची युती तुटलीत्यांच्यामुळेच पक्ष फुटला, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या या दाव्यावर संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
भाजपासोबतची २५ वर्षांची युती तोडायला लावणारे पहिले मंत्री एकनाथ शिंदे हेच होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आमचा छळ होतोय, असं एकनाथ शिंदे यांनीच जाहीरपणे सांगितलं होतं. त्यांनीच पहिल्यांदा राजीनामा दिला होता, असं विधान संजय राऊत यांनी केलं. ते ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
‘भाजपासोबतची युती तुटणे, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अस्तित्वात येणे, शिवसेना पक्ष फुटणे. या सर्वाला संजय राऊत जबाबदार आहेत’ या शिंदे गटाच्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “ते सगळे खोटं बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राजीनामा द्यायला निघालेले पहिले मंत्री एकनाथ शिंदे हेच होते. फडणवीस सरकारमध्ये आमचा छळ होतोय, असं एकनाथ शिंदेंनी जाहीरपणे सांगितलं होतं. फडणवीस सरकारमधून राजीनामा देणारे पहिले मंत्री एकनाथ शिंदेच होते.भाजपाबरोबर आम्हाला राहायचं नाही. आम्हाला मोकळं करा, असं आमच्या एकनाथ शिंदे यांनीच जाहीरपणे सांगितलं होतं. त्यांची अनेक भाषणं आहेत, तुम्ही पाहू शकता,” असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.