बोरी बुद्रूक शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी
जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रूक शिवारात दुचाकीवरून जाणा-मा दाम्पत्यावर ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाल्याची घटना मंगळवार दि.२१/१२/२०२१ रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडली.
हौसाबाई दत्तात्रय शिंदे रा.शिंदेमळा, बोरीबुद्रूक असे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पत्नी हौसाबाई हे दुचाकीवरून बोरी गावठाणातून रस्त्याने त्यांच्या शिंदेमळ्यातील राहात्या घरी जात होते.
सिद्धेश्वर मंदीराजवळ ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर झडप मारली.
या हल्ल्यात हौसाबाई शिंदे यांच्या डाव्या पायाला बिबट्याने कडाडून चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच आळे वनपरिमंडलाचे वनपाल संतोष साळूंखे, वनरक्षक त्र्यंबक जगताप, व ग्रामस्थ घटनास्थळी आले. जखमी हौसाबाई शिंदे यांना उपचारासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. लस उपलब्ध न झाल्याने त्यांना जुन्नर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.