दहावीच्या परिक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखेत बदल
Raju tapal
November 05, 2024
55
दहावीच्या परिक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखेत बदल;
परिक्षेचे अर्ज भरण्यास दोन आठवड्यांची मुदतवाढ
पुणे:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसंदर्भात माहितीचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या आगामी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचं बोर्डाने ठरवलं आहे. नव्या सुधारीत वेळापत्रकानुसार 6 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. तर त्यानंतरचे दहा दिवस म्हणजेच 20 ते 30 नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह अर्ज भरता येतील, असं बोर्डाने सांगितलं आहे.
राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. नियमित आणि प्रचलित अशा दोन पद्धतीने अर्ज भरले जाणार आहे. सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. तसेच पुनर्परीक्षार्थी, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भरायचे आहेत.
सध्याच्या वेळापत्रकानुसार आजची तारीख म्हणजेच 5 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता अर्ज भरण्यास यामध्ये दोन आठवड्यांची वाढ करत मुदतवाढ देण्यात आली आहे. माध्यमिक शाळांनी अर्ज भरण्यापूर्वी शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची माहिती भरून मंडळाकडे पाठवणे अनिवार्य आहे. परीक्षा अर्ज ऑनलाइन भरायचे असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमार्फत अर्ज भरणे आवश्यक असल्याचं बोर्डाने म्हटलं आहे. विद्यार्थ्यांनी अर्जात भरलेली माहितीची पडताळणी करून ती अचूक असल्याची खात्री करुन घेण्याची जबाबदारीही शाळांचीच आहे.
विद्याथ्यर्थ्यांचे अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रीलिस्ट 4 डिसेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची घोषणा करण्यात आलेली. राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती देताना 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह बारावीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले जातील, असं सांगितलं होतं. तसेच त्यानंतर म्हणजेच 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह 12 वीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.
Share This