• Total Visitor ( 134483 )

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्याची १०० टक्के उद्दिष्टपूर्ती 

Raju tapal March 28, 2025 11

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्याची १०० टक्के उद्दिष्टपूर्ती 
 रत्नागिरी : - मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान देणारी महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ८०० प्रकरणांचे उद्दिष्ट्य होते.  जिल्ह्यात एकूण २४४२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २२१६ नवउद्योजकांचे अर्ज पात्र ठरले. त्यापैकी ८०८ नवउद्योजकांची कर्जप्रकरणे मंजूर करून वित्त पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी दिली.
जिल्ह्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अग्रणी बँक व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक, शाखा व्यवस्थापक व जिल्हा उद्योग केंद्राच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यानी विशेष परिश्रम घेतले.

बँक ऑफ इंडियाने २२७, बँक ऑफ महाराष्ट्र १३३, विदर्भ कोकण ग्रामीण बँक १३३, कोटक महिंद्रा बैक ८०, स्टेट बँक ऑफ इंडियाने ६०, युनियन बँक ४७ अशी मंजुरी नोंदवली आहे.  तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील इतर सर्व बँकांनी उद्दिष्टपूर्तीसाठी सहकार्य केले आहे.

सार्वजनिक व खासगी बँकानी त्यांना दिलेले उद्दिष्ट्य विहित वेळेत पूर्ण केल्याने चालू आर्थिक वर्षात योजनेंतर्गत जिल्ह्याची उद्दिष्ट्यपूर्ती झालेली आहे. याकरिता जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सातत्यपूर्ण बैठका घेवून हे लक्ष्य साध्य केले आहे.  सर्व बँकांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकाचे अभिनंदन केले असून, भविष्यात देखील जिल्हा आघाडीवर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व केंद्र शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेत जिल्ह्यातील सर्व बँकांचा सकारात्मक दृष्टीकोन आहे. या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीने घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी  केले आहे.

 

Share This

titwala-news

Advertisement