विजेच्या धक्क्याने बापलेकाचा मृत्यू; साबळेवाडी येथील घटना
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- विजेच्या धक्क्याने बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी जवळील साबळेवाडी शिवारात शुक्रवार दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
सुदाम सुभाष गाढवे वय -४३ ,भारत सुदाम गाढवे वय -१७ अशी मृतांची नावे आहेत.
या घटनेबाबत समजलेल्या माहितीनुसार,सुदाम गाढवे सकाळी विहीरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेले होते. ते बराच वेळ होवूनही परत न आल्याने त्यांचा मुलगा भारत त्यांना पाहाण्यासाठी विहीरीवर गेला. वडिलांना पाण्यात पडलेले पाहून वडिलांना वाचविण्यासाठी मित्राला हाक मारत पाण्यात उडी घेतली.
विहीरीतील पाण्यात करंट उतरल्याने त्यालाही विजेचा जबर धक्का बसल्याने दोघांनाही जीव गमवावा लागला.
भारतच्या मित्राने बाजूच्या लोकांना बोलावून घेतले. वीजप्रवाह बंद करून ग्रामस्थांनी बापलेकाला विहीरीतून बाहेर काढून तातडीने दवाखान्यात दाखल केले.
उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
गाढवे कुटुंब अहिल्यानगर जिल्ह्यातील नांदूर पठारचे मूळ रहिवासी असून ते टाकळी हाजी येथे स्थायिक झाले होते. सुभाष गाढवे हे धार्मिक कार्यात सहभाग घेत असत. टाकळीकर प्रासादिक दिंडी सोबत दरवर्षी देहूपासून पंढरपूर वारीत सहभागी होत होते.