चोरीस गेलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा वाई पोलीसांकडून २४ तासाच्या आत शोध
खानापूर ता.वाई येथून दोन दिवसांपूर्वी चोरीस गेलेल्या एम एच १४ ए ई १७०३ या क्रमांकाच्या पांढ-या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा २४ तासांच्या आत शोध घेण्यात पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई गुन्हे प्रगटीकरण विभागाच्या पोलीसांना यश आले.
१५ फेब्रुवारीला खानापूर येथील सुनील मोहन चव्हाण वय - २८ यांच्या मालकीची ७ लाख रूपये किंमतीची पांढ-या रंगाची स्कॉर्पिओ गाडी दुपारच्या दरम्यान चोरट्यांनी पळवून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली.
खेड शिवापूर जि.पुणे येथील टोलनाक्यावरून स्कॉर्पिओ गाडी पुण्याच्या दिशेने गेल्याची खबर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळाली असता त्यांनी पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड ,नाशिक, अहमदनगर येथील गुन्हे शाखेच्या अधिका-यांशी संपर्क साधून चोरीच्या गाडीच्या तपासाबाबत सुचना करत चोरांच्या मागावर वाई गुन्हे प्रगटीकरण कर्मचारी तातडीने रवाना केले
मनमाड नाशिक येथील गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी स्कॉर्पिओ गाडीसह दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळाली असता वाई गुन्हे प्रगटीकरण विभागाच्या कर्मचा-यांनी आरोपी कमलेश साखरलाल महाजन वय -२३ रा पारवा ता.जि.जळगाव , दत्तात्रय साहेबराव पवार वय - ३७ रा. कोष्टीगल्ली पारोळा ता.जि.जळगाव यांच्यासह स्कॉर्पिओ २४ तासांत वाई पोलीस ठाण्यात हजर केली.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे वाई गुन्हे प्रगटीकरण विभागाचे कर्मचारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, महिला पोलीस नाईक सोनाली माने, पोलीस कॉन्स्टेबल अमित गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदूस्कर, श्रावण राठोड यांनी कारवाईत सहभाग घेतला.