मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्वीकारणार?
आज राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्हं एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहे.शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आज संध्याकाळी 7 वाजता ताज प्रेसेंडेंट हॉटेलमध्ये होणार आहे.तर या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्विकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित रहाणार आहेत. या बैठकीत शिवसेनेच्या नव्या वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. आज ते यासंबधी याचिका दाखल करणार आहेत. ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी काल ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाने फटकारले. अर्ज दाखल न करताच ठाकरे गटाने सुनावणीची विनंती केली होती. मात्र तातडीने सुनावणीची विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मेन्शनिंग लिस्टमध्ये अर्ज दाखल करायला पाहिजे, लिस्टेड नसताना कोणतीही तारीख कोर्ट देऊ शकत नाही, असं कोर्टाने ठाकरे गटाला सुनावले. त्यानुसार आज सकाळी अकरा वाजता ठाकरे गट आपली केस दाखल करणार आहे. त्यावर आजच सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवरती सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी पार पडणार आहे. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचं याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. आता 3 दिवसांच्या सुनावणीत ते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. गेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.