१६ रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सकपाळ रत्नागिरी दौऱ्यावर
काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे येत्या १६ मार्च रोजी रत्नागिरीच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, अशी माहिती काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोकणात काँग्रेस पक्षाची सर्वाधिक पडझड झाली आहे. ही पडझड रोखण्यासाठी आणि पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी प्रदेशस्तरावरील वरिष्ठ पदाधिकारी रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार हुस्नबानू खलिफे, रमेश कीर, अशोक जाधव, दीपक राऊत, बाळा मयेकर, भाई सावंत, ॲड. अश्विनी आगाशे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राज्यभर दौऱ्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे जिल्हे संघटनात्मक अडचणीत आहेत, अशा ठिकाणी मेळावे व्हावेत, असे सांगितले होते. त्यानुसार पहिलाच दौरा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा जाहीर झाला आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे १६ मार्च रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या दोन दिवसांत दौऱ्याची रूपरेषा जाहीर होणार आहे. या दौऱ्यात ते प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे गणेश पाटील यांनी सांगितले.