• Total Visitor ( 84812 )

कोरोना परततोय....

Raju Tapal March 23, 2023 52

कोरोना परततोय;
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दीड हजारपार;
तर बुधवारी 334 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोना संपलाय, असे म्हणत असाल तर राज्याची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्यानं बुधवारी दीड हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे राज्याचं टेन्शन वाढत चाललंय. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे.

राज्यात बुधवारी कोरोनाच्या 334 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1 हजार 648 वर गेली आहे. तर कोविड बाधित एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ मुंबई, ठाण्यात अधिक रुग्ण आहे. पुण्यात 496, मुंबईत 361 आणि ठाण्यात 314 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

बुधवारी एकूण 174 रुग्ण बरे होऊन घरी परतले

राज्यात बुधवारी एकूण 174 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण 79, 90, 401 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.05 टक्के इतकं झालं आहे. राज्यात बुधवारी केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णाांची एकूण संख्या 81,40,479 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 8,65,63,502 इतक्या प्रयोगशाळा तपासण्या झाल्या आहेत. त्यापैकी 9.40 टक्के नमुने हे पॉझिटिव्ह सापडले आहेत.

राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन

पुण्यासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोर्डवर आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आढावा बैठक

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (22 मार्च) सायंकाळी आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोना आणि एचएन 2 इन्फ्लूएंझा व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. रूग्ण, आरोग्य व्यावसायिक आणि आरोग्य कर्मचारी या सर्वांनी, रुग्णालयाच्या आवारात मास्क घालण्यासह कोविड योग्य वर्तनाचं पालन करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेले रुग्ण गर्दीच्या ठिकाणी वावरत असताना, त्यांनी आणि सर्वांनी मास्क घालणं उपयुक्त आहे, असही पंतप्रधानांनी यावेळी ठामपणे सांगितलं.

Share This

titwala-news

Advertisement