जिवंत झाडांवरील रोषणाई पोलिसांच्या रडारवर !
पोलीस आयुक्तांचे उपायुक्तांना कार्यवाहीचे निर्देश...निसर्गसत्ताच्या जनहितार्थ निवेदनाची दखल
ठाणे :- प्रतिनिधी सण उत्सवांच्या नावाखाली जिवंत झाडांवर विद्युत रोषणाई आणि सजावटीचा भार टाकून त्यांच्या नैसर्गिक अस्तित्वालाच धोका निर्माण केला जात असताना,या प्रकारांना कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या मागणीची ठाणे पोलिसांनी दखल घेतली आहे. पर्यावरण संरक्षणासाठी निसर्गसत्ता पर्यावरण संस्थेच्या वतीने सादर केलेल्या जनहितार्थ निवेदनावर पोलीस आयुक्त कार्यालयाने संबंधित पोलीस उपायुक्तांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत ठाणे शहरात सण उत्सवांच्या काळात जिवंत झाडांच्या खोडांवर आणि फांद्यांवर विद्युत दिव्यांच्या माळा,वायरिंग तसेच सजावटीचे साहित्य लावले जाते. सौंदर्यीकरणाच्या नावाखाली होणाऱ्या या प्रकारामुळे झाडांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होण्याबरोबरच पक्षी,कीटक आणि अन्य जैवविविधतेच्या अधिवासालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे जिवंत झाडांवरील विद्युत रोषणाई व सजावटीस कायमस्वरूपी बंदी घालून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याची मागणी निसर्गसत्ताचे डॉ. प्रशांत सिनकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली होती. या निवेदनाची पोलीस आयुक्त कार्यालयाने दखल घेत संबंधित पोलीस उपायुक्तांकडे ते पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे. तसेच आवश्यक कार्यवाही करून निवेदनकर्त्याला त्याबाबत कळविण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे झाडांच्या संरक्षणासाठी केलेल्या जनहितार्थ पाठपुराव्याला प्रशासकीय प्रतिसाद मिळाला आहे. झाडे ही शहराची नैसर्गिक संपत्ती असून पक्षी व कीटकांचे हक्काचे अधिवास आहेत. उत्सवांचा आनंद साजरा करताना त्यांच्या अस्तित्वाला बाधा पोहोचू नये. त्यामुळे सजावटीपेक्षा झाडांचे संरक्षण महत्त्वाचे मानून पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करण्याची गरज आहे. शहराचे सौंदर्य वाढविताना निसर्गाचे अस्तित्व धोक्यात येऊ नये,ही भूमिका या निवेदनातून मांडण्यात आली आहे. आता संबंधित यंत्रणा या मागणीवर कोणती ठोस कार्यवाही करते,याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.
डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक,निसर्गसत्ता,ठाणे)