शंभोनाथाच्या संजीवन समाधी दर्शनासाठी महाशिवरात्रीला भाविक भक्तांची गर्दी
जागृत देवस्थानामुळे जिल्ह्यातून भाविकांनी लावली तळेगाव ढमढेरेत हजेरी
शिरूर :- महाशिवरात्री उत्सवानिमित्त शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील श्री शंभोनाथाच्या दर्शनासाठी भरदुपारच्या उन्हातही शंभू भक्तांच्या रांगा लागलेल्या होत्या.
श्री शंभुनाथ महादेव महाशिवरात्र उत्सवानिमित्त तळेगाव ढमढेरे येथे सहा दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .या सहा दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये कलश पूजन, काकड आरती, हरिपाठ, प्रवचन,कीर्तन व हरिजागर असे धार्मिक होत आहेत. यावेळी पांडुरंग गुंजाळ,श्रीहरी आळंदकर,आदिनाथ जुन्नरकर व उद्धव कोळपकर यांची कीर्तनरुपी सेवा या अखंड हरिनाम सप्ताह काळात आयोजित केली. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे श्रींचा अभिषेक पार पडला.
शंभुनाथ बाबा हे महादेवाचे भक्त शेजारीच काशी विश्वेश्वर मंदिरात चार मुखी पिंडीचेही भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतात.
श्री शंभुनाथ देवस्थान, श्रीनाथ तरुण मंडळ,सिद्धेश्वर तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्या माध्यमातून संयोजन व नियोजन करण्यात येते. महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी बाहेरगावी गेलेले स्थानिक ग्रामस्थ महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात.जागृत देवस्थान असल्याने पंचक्रोशीसह जिल्ह्यातून अनेक भाविक दर्शनासाठी तळेगाव ढमढेरे येथे येत असल्याने दरवर्षी मोठी गर्दी होत असते.
भाविकांचे मोठे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान असल्यामुळे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत भाविकांनी प्रथम शंभोनाथाच्या संजीवन समाधीचे व नंतर काशीविश्वेश्वर मंदिरातील चारमुखी पिंडीचे दर्शन घेतले. मुख्य बाजारपेठेपासून मंदिरापर्यंत दुतर्फा दुकानांच्या रांगा होत्या.विशेषत; अनेक भाविक परंपरा जपत आपला नवस फेडण्यासाठी घरापासून मंदिरापर्यंत सवाद्य दंडवत घालत येत होते. मंदिरात आल्यानंतर गुळाचा व पेढ्याचा प्रसाद वाटला गेला. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कासार समाजाचा मेळावा,तर तिसऱ्या दिवशी शंभुनाथ बाबांचा पालखी सोहळा शंभोनाथ मंदिरापासून बाजारपेठेतून पीरबाबांच्या मंदिरापर्यंत निघत असतो.विशेषतः हा पालखी सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून भाविक भक्त गर्दी करतात या पालखी सोहळ्याचे भाविकांसाठी मोठे आकर्षण असल्याने पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.
श्रीनाथ तरुण मंडळ व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून मोठा निधी उभा करून शंभुनाथ मंदिराचा विकास काही वर्षांपूर्वी करण्यात आलेला आहे असे विश्वस्तांनी सांगितले.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )