• Total Visitor ( 84423 )

डोनाल्ड ट्रम्प बनले अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष

Raju tapal November 06, 2024 43

डोनाल्ड ट्रम्प बनले अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष;
कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय 

वॉशिंग्टन:-अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. फॉक्स न्यूजनुसार, ट्रम्प यांनी इलेक्टोरल कॉलेजच्या २७० मतांचा जादुई आकडा गाठला असून दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याचा ट्रम्प यांचा मार्ग मोकळा झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जानेवारी महिन्यात शपथ घेतील.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी होण्यासाठी ५३८ इलेक्टोरल मतांपैकी २७० मतं मिळवणं आवश्यक असतं. दरम्यान आतापर्यंत ४८१ निकाल हाती आले असून, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना २६७ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. तर कमला हॅरिस यांना २१४ इलेक्टोरल मतं मिळाली आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प हे विस्कॉसिन, मिशिगन, अरिझोना, नेवाडा आणि अलास्का या राज्यांमध्ये आघाडीवर असल्याने ते तीनशेपार मजल मारतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

२०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र पराभवाचा धक्का बसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. तसेच त्यांनी आक्रमक प्रचार करत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीही मिळवली होती. त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांनी आव्हान उभं केलं होतं. मात्र अटीतटीची मानली जाणारी ही अध्यक्षीय निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी सहजपणे जिंकली. त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीत इलेक्टोरल मतांसह पॉप्युलर मतांमध्येही कमला हॅरिस यांना मात दिली आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement