आपट्याची पाने एकमेकांना वाटून दसरा सण कोंढापुरीत साजरा
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- आपट्याची पाने एकमेकांना वाटून शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे विजयादशमी, दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बोल्हाई देवीची काठी वाजंत्र्याच्या साथीत वाजत - गाजत, मिरवत काठीचे मानकरी, पाटील घराण्याचे वंशज संजय बाजीराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल रूक्मिणी मंदीरापासून पुणे - अहिल्यानगर महामार्गालगत असलेल्या बोल्हाई मंदीराकडे नेण्यात आली.
सायंकाळी ७ वाजता गावचे कुलदैवत खंडोबा देवाची झेंडाकाठी वाजंत्र्याच्या साथीत वाजत - गाजत, मिरवत,तेल,पलिद्याने पाजळलेल्या दिवटीच्या उजेडात खंडोबा मंदिर, मल्हार गडावर नेण्यात आली.
काठीचे मानकरी दत्तात्रय लहानबा गायकवाड,अजय दत्तात्रय गायकवाड,विनय दत्तात्रय गायकवाड, संदीप कुंडलिकराव गायकवाड, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अमर अशोकराव गायकवाड, जयमल्हार गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख नितीन सुरेशराव गायकवाड, माजी उपसरपंच माणिकराव वसंतराव गायकवाड, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष मधुकर जगन्नाथराव गायकवाड, सोसायटीचे माजी चेअरमन दीपक संपतराव गायकवाड, सोसायटीचे संचालक नामदेवराव मल्हारराव गायकवाड, पत्रकार विजय संभाजीराव ढमढेरे, संतोष मारूतीराव गायकवाड, शामराव गेनूजी घाडगे, शामराव नामदेव गायकवाड,प्रदीप बापूराव गायकवाड, शांताराम काशिनाथ गायकवाड, प्रकाश हरिभाऊ घाडगे हे झेंडा काठी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
बोल्हाई मंदीराजवळ ग्रामस्थांनी आपट्याची पाने सोने म्हणून लुटली. ग्रामस्थांनी आपट्याची पाने मंदीरातील मुर्तीसमोर ठेवून देवदर्शनही घेतले. एकमेकांना आपट्याची देवून आलिंगनही घेतले.
ग्रामस्थांनी घरोघरी आपापल्या शेती अवजारे,शस्त्रपुजन तसेच वाहनांचेही पुजन केले.
दसरा हा सण पराक्रमाचा, पौरूषाचा सण समजला जातो. याच दिवशी देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले.
पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यानंतर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली,त्या झाडाची पूजा केली तोच हा दिवस. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. शूर,पराक्रमी राजे याच दिवशी दुस-या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सिमोल्लंघन म्हणत. दसरा हा पराक्रमाचा,देण्या-घेण्याचा,परस्परांत प्रेम वाढवण्याचा सण आहे असे सांगितले जाते.
.