पंजाबात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना जिल्हाप्रमुखाची गोळ्या घालून हत्या
दूध आणायला गेलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या
पंजाब:-पंजाबमधील मोगा येथे शिवसेना शिंदेगटाच्या जिल्हाप्रमुखाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मंगत राय मंगा असे या जिल्हाप्रमुखाचे नाव आहे.
मंगत राय यांच्यावर झालेल्या या हल्ल्यात एक अल्पवयीन मुलगा जखमी झाल्याची माहिती आहे. ही संपूर्ण घटना गुरुवारी रात्री घडल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगत राय हे रात्री दहाच्या सुमारास गिल पॅलेस येथे दूध घेण्यासाठी गेले होते.यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला, परंतु गोळी मंगाऐवजी १२ वर्षांच्या मुलाला लागली, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मंगा यांनी ताबडतोब दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्यांची हत्या केली. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी राय यांना मृत घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठलाग करताना हल्लेखोरांनी पुन्हा मंगा यांच्यावर गोळीबार केला आणि यावेळी गोळी मंगा यांना लागली. मंगा यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.तर दुसरीकडे जखमी अल्पवयीन मुलाला मोगा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले.या घटनेबाबत माहिती मिळताच विश्व हिंदू शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगिंदर शर्मा रूग्णालयात दाखल झाले होते. दुसरीकडे मंगत राय मंगा यांच्या मुलीने सांगितले की, वडील गुरुवारी रात्री ८ वाजता दूध आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण रात्री ११ वाजता कोणीतरी आम्हाला सांगितले की माझ्या वडिलांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. आम्हाला न्याय हवा आहे,आणि तो मिळवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत.
पोलिस उपअधीक्षक (शहर) रविंदर सिंह यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री दोन ठिकाणी गोळीबार झाला. "बगियाना बस्ती येथे एका सलून मालकाला दुखापत झाली," असे ते म्हणाले. दुसऱ्या एका घटनेत, स्टेडियम रोडवर मंगत राय मंगा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक अल्पवयीन मुलगा जखमी झाला. मंगाचा मृतदेह सरकारी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.