एमबीए,एमएमएससाठी प्रवेश परीक्षेला सुरुवात
सीईटी सेल अंतर्गत एमबीए/एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची सीईटीला मंगळवार, दि. १ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. तीन दिवस ही परीक्षा चालणार असून सकाळी ९.०० ते ११.३० वा. दुपारी ०२.०० ते ४.३० वा. या दोन सत्रात १७४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत असून १.५७ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत.
एमबीए व एमसीए अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी असलेल्या सीईटीला गतवर्षीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे. एमबीए सीईटीसाठी १ लाख ५७ हजार २८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमबीए, एमएमएस व अभियांत्रिकी या सामाईक प्रवेश परीक्षांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून अवांछित कॉलच्या माध्यमाद्वारे उमेदवारांना गैरप्रकारे पर्सेटाईल वाढवून देण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. सदर तक्रारींची तातडीने दखल घेवून एफआयआर दाखल केला आहे.सीईटी परीक्षा पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असून विद्यार्थी आणि पालकांनी अफवांना बळी पडू नये,असे आवाहनही सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.