• Total Visitor ( 430647 )
News photo

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांचा बांबू लावण्याचा निर्धार

Raju tapal May 28, 2025 57

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांचा बांबू लावण्याचा निर्धार...



महाराष्ट्र शासन व श्रमजीवी संघटनेच्या वतीने आयोजित मेळाव्याला आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ..!



राजू टपाल. 

टिटवाळा :- महाराष्ट्र शासनाच्या धोरणा नुसार वनपट्टे तसेच खासगी जमिनीवर बांबूची लागवड करण्यासंबंधीचा मेळावा टिटवाळा मध्ये श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य,कल्याण तालुक्याच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता. या विशेष मेळाव्याला कृषी मूल्य आयोग समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा ) तथा बांबू मिशन महाराष्ट्र शासन अध्यक्ष पाशा पटेल यांनी या बांबू मेळाव्यात बांबू लागवड करणे, बांबूचे फायदे, बांबूपासूनची उत्पादन केल्यापासून अर्थिक फायदे,बांबू लागवड करणे काळाची गरज, शासनाचे अनुदान आणी रोजगार आणि उपजीविका या विषयावर पाशा पटेल यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे  उपस्थित मान्यवरांनी सुद्धा बांबू लागवडीचे फायदे सविस्तर विषद केले. या मेळाव्याला राज्य स्तरीय आदिवासी विकास समिती अध्यक्ष महाराष्ट्र शासन (मंत्री दर्जा) तथा संस्थापक अध्यक्ष श्रमजीवी संघटना विवेक पंडीत उपस्थित राहणार होते मात्र काही अपरिहार्य कारणा मुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. या मेळाव्या साठी श्रमजीवी संघटना कल्याण तालुका सर्व कार्यकर्ते आणि तहसीलदार बिडीओ प्रशासन यांनी विशेष मेहनत घेतली होती.

आतबट्टयाची ठरलेली भातशेती आता करायची नाही,शासनाकडून सात लाख चार हजाराचे अनुदान घेऊन बांबू शेती करायची,सोबत आंतरपीक पण घ्यायचे. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून आदिवासी ठाणे जिल्ह्याचा कायापालट करू असा निर्धार श्रमजीवी संघटना आणि ठाणे जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे दिसल तिथं बांबू लावण्याचा निर्धार कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेला आहे. 

शाश्वत विकास साधण्यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीस शेतकऱ्यांना उद्युक्त करून जिवाश्म इंधनाला पर्याय म्हणून बांबूचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 'पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स गठीत करण्यात आलेला आहे. बांबू वृक्ष लागवडीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल होणार असून पर्यावरणाचा होणारा -हास कमी होण्यास मदत होणार आहे. फक्त पर्यावरण संवर्धनासाठी नव्हे तर बांबूचा उपयोग इतर अनेक कामांसाठी केला जातो, जसे की इमारती,फर्निचर आणि कागद निर्मितीसाठी तसेच प्रामुख्याने इंधन निर्मितीसाठी शेतकऱ्यांना एक शाश्वत पीक म्हणूनही बांबू लागवडीचा पर्याय नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे बांबू लागवड ही काळाची गरज असल्याचे धोरण आता निश्चित झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार वनपट्टे तसेच खाजगी जमिनीवर बांबू  लागवड करीता आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बांबू लागवड मेळाव्याचचे आयोजन करण्यात आलेले आहे. पाशा पटेल अध्यक्ष,राज्य कृषी मूल्य आयोग (मंत्री दर्जा) हे 'मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स अंतर्गत स्थापित कार्यकारी समितीच्या अध्यक्ष तसेच विवेक भाऊ पंडित,अध्यक्ष,राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती (मंत्री दर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली मेळावे आयोजित केलेले आहे. मंगळवारी २७ में २०२५ रोजी टिटवाळा या ठिकाणी बांबू मिशन मेळावा पार पडला. 

यावेळी बोलताना श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर म्हणाले, 'मंजूर झालेले वनपट्टे,आदिवासींच्या ताब्यात असलेले वन जमीन,जे वनपट्टे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे अशा सर्व ठिकाणी मनरेगा योजनेतून बांबू  लागवडीसाठी सरकारने परवानगी दिली पाहिजे. आमदार निधी असो की सीएसआर मिळेल तिथून बांबू लागवडीसाठी अतिरिक्त निधी घ्या. पृथ्वी वाचवण्यासाठी दिसेल तिथे बांबू लागवड करण्याची आवश्यकता असल्याचे म्हणाले. 

मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून बांबू लागवड,बांबू पासून होणाऱ्या 2000 प्रकारच्या वस्तू निर्मिती, वातावरण बदलाच्या संकटात उपयुक्त करणारी बांबू लागवड,भात शेतीचे अर्थशास्त्र आणि बांबू पासून मिळणाऱ्या अनुदान आणि अतिरिक्त उत्पन्नाबद्दल शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन केले. उपस्थित अधिकारी वर्ग आणि  शेतकऱ्यांना समोरासमोर उभे करून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून टिटवाळा मधली सभा चांगलीच गाजली. बांबू विषयक आंतरराष्ट्रीय तज्ञ संजीव कर्पे यांनी गोष्टीच्या माध्यमातून उपस्थित शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे महत्त्व स्पष्ट करून दिले.

मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले, 'भात शेतीच्या मर्यादा आता स्पष्ट झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आता बांबू लागवड व्रतासारखी हाती घ्यायला पाहिजे. प्रशासनाचे सहकार्य आहे. बांबू लागवडीचे सात लाख चार हजाराच्या अनुदान चार वर्षांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला मिळू शकते. बांबू लागवडीची रोपे, खड्डे खणणे,खत देणे,निगा राखणे या सर्व कामासाठी शासनाचे अनुदान देय आहे. त्यासाठी उपस्थित शेतकरी आणि अधिकारी यांना उभे करून त्यांनी प्रत्येकाची जबाबदारी आणि कर्तव्य समजावून दिले. 

यावेळी सदर कार्यक्रमाला  तहसिलदार सचिन शेजाळ,नायब तहसिलदार सत्यजित चव्हाण,गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी, कृषी अधिकारी कुमार जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे पोलीस निरीक्षक सुरेश कदम,वनाधिकारी आर.शिंदे,

श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सपाटे,तालुका अध्यक्ष विष्णू वाघे,सरचिटणीस राजेश चन्ने,

माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत इत्यादी जण प्रमुख उपस्थितीत होते. 

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement