• Total Visitor ( 84338 )

आप्तस्वकीय कोणाला तापदायक

Raju tapal November 05, 2024 12

आप्तस्वकीय कोणाला तापदायक
सलग दोन निवडणुकांमध्ये पराभवाची धूळ चाखलेल्या राजन तेली यांच्याशी मंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा लढत

सिंधुदूर्ग :-सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात याआधी सलग दोन निवडणुकांमध्ये पराभवाची धूळ चाखलेल्या राजन तेली यांच्याशी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा लढत होत आहे. मात्र, यावेळी राजन तेली हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक रिंगणात असून महायुतीमध्ये भाजपाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी बंडखोरी करून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दिपक केसरकर यांना आघाडीप्रमाणेच आप्तस्वकीयांचाही सामना करावा लागणार आहे.

मागील सलग तीन निवडणुकांमध्ये विजयी मिळविलेल्या दीपक केसरकर यांना सावंतवाडीचा बालेकिल्ला टिकविण्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीतही बिघाडी असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अर्चना घारे-परब यांनीही आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

२००९ नंतर प्रथमच नारायण राणेंचा दिपक केसरकरांना पाठिंबा

२००९ मध्ये दीपक केसरकर पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून आमदार झाले.त्यावेळी त्यांच्यासमवेत तत्कालीन काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणेंचा पाठिंबा होता.

मात्र, २०१४ आणि २०१९ या दोन निवडणुका दीपक केसरकर यांनी शिवसेनेकडून लढविल्या आणि त्यांच्याविरोधात राजन तेली हेच उमेदवार होते. तेली २०१४ ला भाजपाकडून तर २०१९ ला अपक्ष म्हणून लढले. मात्र, या दोन्ही निवडणुकीत दिपक केसरकरांनी बाजी मारली होती.

आता तर दीपक केसरकर चाैथ्यांदा रिंगणात असून यावेळी त्यांना भाजपची म्हणजे नारायण राणेंची साथ मिळणार आहे.

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?

लोकसभा निवडणुकीत भाजपचे नारायण राणे विजयी झाले. सावंतवाडी मतदारसंघात त्यांना २९ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यात केसरकरांचा मोठा वाटा होता.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

गेल्या पाच वर्षात केसरकर यांनी अनेक प्रकल्पांची घोषणा केली मात्र, त्यातील एकही मोठा प्रकल्प ते पूर्ण करू शकले नाहीत.

दीपक केसरकर यांच्याविरोधात अपक्ष म्हणून भाजपच्या विशाल परब यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीतील भाजपाची साथ मिळविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement