• Total Visitor ( 84352 )

आधी खाकी, मग बाकी

Raju tapal October 30, 2024 60

आधी खाकी, मग बाकी;
निवडणुकीमुळे पोलिसांच्या रजा, सुट्ट्या रद्द
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल

सिंधुदुर्ग :-गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर यंदाची सिंधुदुर्ग पोलिसांची दिवाळी निवडणुकीच्या बंदोबस्तात आणि धावपळीत जाणार आहे. पोलिसांच्या रजा, सुट्ट्या २५ नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबियांना कुटुंबप्रमुखाशिवाय सण साजरा करावा लागणार, असे चित्र दिसते. विशेष म्हणजे जिल्ह्याबाहेरील बहुतांश पोलिस अधिकारी महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यात सेवा देत आहेत.

लोकसभा निवडणुकीत जवळपास दोन महिने पोलिस बंदोबस्तात व्यस्त होते. त्यानंतर थोड्या दिवसांची विश्रांती मिळाली. पुन्हा गणेशोत्सवात पोलिस यंत्रणा बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यानंतर नवरात्रोत्सवाचा बंदोबस्तही झाला. विधानसभा निवडणुकीची लगबग ऐन दिवाळीत सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार यंदाच्या दिवाळीतच निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे.जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात जवळपास चार हजारांहून अधिक पोलिस, होमगार्डस, राज्य राखील दलाचे पोलिस यांचा बंदोबस्त राहणार आहे.

सणासुदीच्या काळात कुटुंबियांपासून दूरच

निवडणूक म्हटली की, उमेदवारांच्या अर्ज भरण्यापासून ते निकालापर्यंत पोलिसांना दक्ष राहावे लागते. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना रात्रंदिवस सज्ज रहावे लागते. यंदा तर दिवाळी सणाचा बंदोबस्त आणि निवडणूक दोन्हींकडे पोलिस यंत्रणेला लक्ष द्यावे लागणार आहे. निवडणुका म्हटले की पोलिसांच्या रजा आणि सुट्ट्या बंद होतात. त्यानुसार यंदाही पोलिसांना सणासुदीच्या काळात कुटुंबियांकडे लक्ष देता येणार नाही.

साप्ताहिक सुट्ट्या, रजा रद्द

पोलिस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि रजा रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ वैद्यकीय रजा आणि अत्यावश्यक कारणासाठीच्या रजा घेता येणार आहेत.

निकालानंतरच जाणार स्वगावी

जिल्ह्याबाहेरील रहिवासी असलेले बहुतांश पोलिस अधिकारी लक्ष्मीपूजन कर्तव्याच्या ठिकाणी दरवर्षी करतात. लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी चार ते पाच दिवसांच्या रजा काढून दूरवरील स्वगावी जातात. मात्र, यंदा विधानसभा निवडणुकीमुळे रजा मिळणार नाही.

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्हा आहे. नजिकच्या गोवा राज्यातून महाराष्ट्रातील विविध भागात अवैध दारूची वाहतूक होऊ शकते. त्यामुळे सीमेवरील सर्व तपासणी नाके आणि अंतर्गत छोट्या मोठ्या रस्त्यांवर पोलिसांचा कडक पहारा असून विविध टीमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. माझे पोलिस बांधव अहोरात्र सेवा देणार असून 'आधी खाकी मग बाकी' म्हणत कर्तव्य बजावणार आहेत.
सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग.
 

Share This

titwala-news

Advertisement