फलकलेखनातून मिळतेय सामान्य ज्ञान
ज्ञानगंगा उपक्रम : उत्तमसरा शाळेच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना बक्षिसांची मेजवानी
अमरावती/भातकुली- प्रत्येक शाळेत फलक लेखनातून विद्यार्थ्यांना नवनवीन विषयांचे ज्ञानार्जन होते. पण जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उत्तमसरातील विद्यार्थ्यांना शालेय विषयासह सामान्य ज्ञानाची माहिती तर मिळतेच याशिवाय सामान्य ज्ञानवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उत्तरे दिल्यास बक्षीस सुद्धा प्राप्त होते. विज्ञान शिक्षिका शीतल भोपाळे (अथाटे) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ' ज्ञानगंगा घरोघरी ' या नवोपक्रमातून विद्यार्थी अधिक ज्ञानसमृध्द होत आहे.
नववर्षाचा संकल्प म्हणून शीतल भोपाळे ह्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा पाया मजबूत व्हावा म्हणून शाळेत दर्शनी भागातील फलकावर सामान्य ज्ञानावर आधारित ' ज्ञानगंगा ' हा उपक्रम सुरू केला. वर्गाबाहेरील फलकावर रोज सामान्य ज्ञानावर आधारित पाच प्रश्न दिले जातात. यामुळे दिवसभरात येता जाता विद्यार्थ्यांची नजर पडते. शिवाय अनेक विद्यार्थी हे प्रश्न वहीत लेखन करतात. दुसऱ्या दिवशी परिपाठात प्रश्नोत्तरे द्वारे याची उजळणी घेतल्या जाते. फलक लेखनावर आधारित उत्कृष्ठ वही लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून बक्षीस सुध्दा देण्यात येते. शिवाय सामान्य ज्ञान लेखनावर आधारित चाचणी द्वारा यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस दिल्या जाते. या उपक्रमकरिता शाळेतील मुख्याध्यापक लोमेश खैरकर, उमेश बसरे, संतोष कुरहेकर, चंद्र शेखर बाम्हणकर, अश्विनी झाडे, प्रतिभा नांदने, ज्योष्ना हायगले, भूषण बुरंगे प्राजक्ता भडके आदींचे सहकार्य लाभते.
फलक लेखनात समाविष्ट बाबी:-
सामान्य ज्ञान आधारित माहिती, संत, थोर माहात्म्य, सामान्य ज्ञानाच्या ट्रिक्स, गणिताच्या सोप्या ट्रिक्स, प्रश्न मंजुषा, दिनविशेष आदी विविधांगी माहितीचा समावेश.
उपक्रम पोहचला सर्वत्र:-
शाळेतील सामान्य ज्ञानावर आधारित फलक लेखनाचे फोटो समाज माध्यमावर टाकल्यावर इतरांना ते आवडले. उपक्रमाला दिवसेंदिवस प्रतिसाद मिळत असल्याने नवीन सत्रात सामान्य ज्ञानाबरोबरच एक चॅलेंजिंग क्वेश्चनचे उत्तर देणाऱ्याचे नावं उमटू लागल्याने स्पर्धा आणखी रंगतदार झाली. समाजमाध्यमावरील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टेस्ट दिल्याने त्यांचाही समावेश वाढला. समाज माध्यमामुळे शाळेतील उपक्रम सर्वत्र पोहचू लागला.