यू-डायस क्रमांकित शाळांच्या जीआयएस मॅपिंगला प्रारंभ
तांत्रिक अडचणींमुळे शाळांची तारांबळ
अमरावती दि.२२ :- राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यभरातील सर्व यु-डायस क्रमांकित शाळांचे जीआयएस मॅपिंग सुरू करण्यात आले. शिक्षण आयुक्तांच्या गुरुवारी (दि.१७) झालेल्या ऑनलाइन बैठकीत यासंदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आणि शाळांना आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिवशी अनेक तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्यामुळे शाळा प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.
राज्य शासनाने जीआयएस मॅपिंगसाठी 'महा स्कूल जीआयएस १.०' हे विशेष अॅप तयार केले असून, ते प्ले स्टोअरवर उपलब्ध नसल्याने त्याची एपीके फाईल शाळांना स्वतंत्रपणे वितरित करण्यात आली होती. काही शाळांना ही फाईल वेळेवर मिळाली नाही, तर काही ठिकाणी मोबाइलच्या प्ले प्रोटेक्ट सेटींगमुळे अॅप इन्स्टॉल करताना अडथळे आले. काही शाळांमध्ये लॉगिन करताना अडचणी, नेटवर्क समस्या, ओटीपी वेळेवर न येणे, अॅप हँग होणे आणि फोटो अपलोड करताना त्रुटी अशा अनेक समस्या उद्भवल्या. प्रत्येक शाळेने संस्थेचा समोरचा दृश्य, एकंदर परिसर, स्वयंपाकगृह, स्वच्छ पिण्याचे पाणी, मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय यांचे जिओ-टॅग केलेले फोटो अपलोड करणे आवश्यक होते. मात्र, अॅपच्या कार्यक्षमतेत अडचणी आल्यामुळे अनेक शाळांचे जीआयएस मॅपिंग अपूर्ण राहिले.
मुख्याध्यापक व शिक्षकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'तांत्रिक अडचणींसोबतच कामाचा ताण वाढला असून नियोजनात सुसूत्रता नसल्यामुळे वेळ वाया गेला', अशी प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी दिली. केवळ एका दिवसात सर्व शाळांचे मॅपिंग पूर्ण करण्याच्या आदेशामुळे अनेकांना अडचणीत सापडावे लागले.
सुट्टया असताना शिक्षक कामात जीआयएस मॅपिंग करायला मुख्याध्यापकांचा विरोध नाही परंतु गेल्या तीन दिवसांपासून तासनतास बसून सुट्टया असतांनी सुद्धा मुख्याध्यापक जीआयएस मॅपिंगचं काम करत आहे. परंतु अॅपच्या गोंधळामुळे व जीआयएस मॅपिंग शाळेतच कराव लागत आहे. याशिवाय काही ठिकाणी शाळेत रेंज नसल्यामुळे जीआयएस मॅप होत नाही तेव्हा प्रशासनाने जीआयएस मॅपिंग करण्यासाठी दुसरा एखादा पर्याय सुचवावा, पर्याय आल्यानंतरच राज्यातील १००% शाळांची जीआयएस मॅपिंग होईल कारण अमरावती जिल्हातील मेळघाट या आदिवासी क्षेञात नेटवर्कच नाही तेथे कसे मॅपिंग होणार.
राजेश सावरकर,राज्य प्रसिध्दी प्रमुख,प्राथमिक शिक्षक समिती